खासदारांच्या दौऱ्या आधी मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदारांना का केली विनंती?

मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करीत काही सूचना दिल्या. त्यांना खरंच प्रमाणिकपणे रस्त्याची वाहतूक कोंडी कमी करायचे असेल तर आमच्या काही सूचना आहेत या या सूचनांची दखल घ्यावी.

  कल्याण : कल्याण शीळ रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी सकाळी कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा पाहणी दौरा आयोजित केला. त्याआधी मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करीत काही सूचना दिल्या. त्यांना खरंच प्रमाणिकपणे रस्त्याची वाहतूक कोंडी कमी करायचे असेल तर आमच्या काही सूचना आहेत या या सूचनांची दखल घ्यावी.

  आज आमचे खासदार कल्याण-शीळ रस्त्याची पाहणी करायला येत आहेत. त्यांना खरंच प्रामाणिकपणे या रस्त्यावरची वाहतुककोंडी कमी करायची असेल तर आमच्या काही सुचना आहेत, या सुचनांची दखल घ्यावी ही विनंती.

  १. पलावा पुल ( Xperia मॅालची बाजू ) याचा एक खांब गॅस पाईप लाईनच्या वर येतोय म्हणून रखडलेला आहे, त्या खांबाचे नवीन आरेखन ( alignment ) मंजूर होऊन आले का ते तपासून त्याचे काम त्वरित सुरू करावे. तसेच याच पुलाच्या आराखड्याची अंतिम मंजूरी रेल्वे कडून आली नव्हती ती आली आहे का ते पण तपासून घ्यावे. त्यापुढे हा पुल कटईला उतरल्यावर लागणारे भूसंपादन झाले आहे का? झाले असल्यास त्याचा मोबदला दिला आहे का हे ही तपासून पहावे. नसल्यास लवकरात लवकर कारवाई करावी.

  २. पलावा पुल ( डोंबिवली कडून शिळफाट्याकडे जाणारी बाजू ) याच्या तीन खांबांची alignment तेथील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी चक्क रस्त्याच्या मध्ये सरकवले आहेत का ते खात्री करून घ्यावी तसेच हे बांधकाम लोढा हेवन मधून कल्याण-शीळ रस्त्याला मिळणाऱ्या मुख्य रस्त्याच्या (DP) मध्ये आहेत का ते ही तपासून बघावे. माझ्या माहिती प्रमाणे ही बांधकामे निष्काषीत करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही ते का काढले जात नाहीत हे ही तपासावे. ( माहीतीसाठी काही व्हिडीओ,फोटो व पत्र पोस्ट करत आहे.)

  ३. पलावा जंक्शनची अनधिकृत बांधकामे काढल्यास इथे मोकळे बस स्थानक व टॅक्सी थांबा करता येईल.

  ४. शिळफाटा येथील पुलाचे काम पूर्ण होऊन ते सुरू झाल्याशिवाय शिळफाटा टेकडीवरचा रस्ता बुलेट ट्रेनच्या कामासाठी बंद करू नये तसेच पुजा पंजाब येथील ठेचा वडापाव सेंटरवर होणाऱ्या गाड्यांच्या पार्कींगवर बंदी घालावी. तसेच अवजड वाहनांच्या प्रवेशाच्या वेळा पाळण्याच्या सुचना वाहतुक विभागास द्यावी.

  ५. शिळ फाटा चौक ( महापे-दिवा) अतिक्रमण मुक्त करावे.

  ६. ऐरोली-काटई उन्नत मार्ग कौसा इथे बोगद्यापर्यंत बऱ्यापैकी झाला आहे तो लवकर कसा सुरू होईल ते पहावे जेणे करून काटई-ऐरोली नाही पण किमान कौसा-ऐरोली मार्ग लवकर सुरू होऊन प्रवाश्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळेल त्यामुळे शीळ-महापे रस्त्यावरची वाहतूककोंडी कमी होईल.

  ७. ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे कौसा ते काटई पर्यंत अजून एका इंच जागेचा सर्वे व भूसंपादन झाले नाही. ते लवकरात लवकर सुरू करून भूसंपादनाच्या मोबदल्यासाठीचे धोरण जाहीर करावे जेणे करून किमान येत्या ५ वर्षात तरी हा टप्पा पुर्ण करून त्याचे लोकार्पण होईल यासाठी प्रयत्न करावे.

  ८. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या माणकोली-मोठागाव, डोंबिवली या पुलाचे काम पूर्ण झाल्याचे दिसते परंतु या पुलाचेही मोठागाव येथील जोड रस्त्याचे आरेखन चुकले आहे व ते सुधारण्याचा आटापीटा सुरू आहे. माझी विनंती आहे की या चुका सुधारत असतानाच या पुलावरून दुचाकी, रिक्षा, व लहान चारचाकी गाड्या सध्या सुरू करू शकता येतील का याचा आढावा घेणे गरजेचे आहे.तसे केल्यास कोन-कल्याण-शीळ रस्त्यावरचा ताण थोडा कमी होईल.