शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीकास्त्र; पुण्याच्या लोकसभेबाबत केले सूचक वक्तव्य

शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून कोविड काळातील कार्यावर टीका केली आहे. तसेच पुण्यातील मनसे लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल याबाबत सूचक वक्तव्य केले.

    पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) या सातत्याने आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections 2024) पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे या राजकीय भाष्य करत आहेत. यावेळी देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला असून कोविड काळातील कार्यावर टीका केली आहे. तसेच पुण्यातील मनसे (MNS) लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.शर्मिला ठाकरे या पुण्यातील कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका आरती बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.

    या कार्यक्रमावेळी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणावर साधला. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मार्च- एप्रिल महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील. मग ऑक्टोबरमध्ये आमदारकीच्या निवडणुका. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका लागतील. पण तरीही आमची कामं थांबत नाहीत. कोविड काळात आपल्या पक्षाने जेवढी काम केलं तेवढी कामं कोणत्याही पक्षाने केली नव्हती. तेव्हा सगळे सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते. आपला पक्ष रस्त्यावर होता. आपली चांगली चांगली पोरं कोविडमध्ये दगावली. तरीही मी अभिमानाने सांगेन की आमचा पक्ष एवढी चांगली कामं करतोय तर तुमचा कृपाशिर्वाद असाच राहु दे,” असे आवाहन शर्मिला ठाकरे यांनी उपस्थितांना केले.

    पुणे लोकसभेच्या उमेदवाराबाबत सूचक वक्तव्य 

    शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या लोकसभा उमेदवाराबाबत सूचक वक्तव्य केले. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल.” अशा शब्दांत त्यांनी सूचक वक्तव्य केले. त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी मनसेचे उमदेवार म्हणून वसंत मोरे यांच्यापेक्षा साईनाथ बाबर यांच्या नावाची शक्यता असल्याची चर्चा सुरु झाली आहे.