मनसेचे ‘मिशन पुणे लोकसभा’; अमित ठाकरेंकडे दिली जाणार महत्वाची जबाबदारी

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) अमित ठाकरेंवर (Amit Thackeray) पुण्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा जिंकण्यासाठी राज ठाकरे यांनी पुण्यावर अधिक लक्ष दिले आहे. यापूर्वी बारामती लोकसभा निवडणुकिसाठी वसंत मोरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.

    पुणे : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) अमित ठाकरेंवर (Amit Thackeray) पुण्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा जिंकण्यासाठी राज ठाकरे यांनी पुण्यावर अधिक लक्ष दिले आहे. यापूर्वी बारामती लोकसभा निवडणुकिसाठी वसंत मोरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, पुणे काबीज करण्यासाठी राज ठाकरेंनी युवा नेते अमित ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. पक्ष बांधणी, उमेदवार निवड, प्रचार अशा विविध जबाबदाऱ्या अमित ठाकरे पार पाडणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

    उमेदवारांची चाचपणी, मुलाखती याचा आढावा स्वतः अमित ठाकरे घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पुण्यातील मनसेचा एक मोठा गट वसंत मोरे यांच्या विरोधात आहे. या गटाकडून वसंत मोरे यांना सातत्याने कार्यक्रमातून डावलले जात आहे. पक्षातील निर्णय प्रक्रियेतही मोरे यांना सहभागी करून घेतले जात नसल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत वसंत मोरे यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली आहे. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. पक्षातील या अंतर्गत वादामुळे कार्यकर्ते वसंत मोरे यांच्या हाताखाली काम करण्याची शक्यता कमी असल्यामुळेच अमित ठाकरे यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत आहे. पुणे हा त्यापैकी एक मतदारसंघ असून, पुण्यातून मनसेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी अमित ठाकरे यांच्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे हे मनसेच्या उमेदवारासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार असलयाचे सूत्रांनी सांगितले. अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिल्यास मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.