पालघरच्या स्टील कारखान्यावर जमावाचा हल्ला, अनेक पोलीस जखमी, १२ वाहनांचे नुकसान

पालघर येथील स्टील कारखान्यावर जमावाने केलेल्या हल्ल्यात १९ पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेत जमावाने आतापर्यंत १२ वाहनांचे नुकसान केल्याची माहिती आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत २७ हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

    मुंबई : पालघर येथील स्टील कारखान्यावर जमावाने केलेल्या हल्ल्यात १९ पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेत जमावाने आतापर्यंत १२ वाहनांचे नुकसान केल्याची माहिती आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत २७ हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना शनिवारी पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरातील एका स्टील कारखान्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एका कामगार संघटनेचे १०० हून अधिक लोकांनी अचानकपणे कारखान्याच्या आवारात घुसले. आत येताच त्यांनी तेथे उपस्थित जवानांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि परिसराची तोडफोडही केली. या संतप्त जमावाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे आलेल्या पोलिसांनाही सोडले नाही आणि त्यांच्या वाहनांचेही नुकसान केले. कामगार संघटनेच्या सदस्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना सुमारे १९ पोलीस जखमी झाले.

    या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २७ जणांना अटक केली आहे. हत्येचा कट रचणे, तोडफोड करणे, जीवित व मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमान्वये या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कारखान्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असल्याचे पालघर पोलिसांचे प्रवक्ते सचिन नावडकर यांनी सांगितले.

    कारखान्याच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, कामगार संघटनेशी संबंधित एक मुद्दा कंपनीत बराच काळ सुरू होता. मात्र, हा सर्व प्रकार कशामुळे घडला हे त्यांनी सांगितलेले नाही. या संतप्त जमावाला शांत करण्यासाठी जेव्हा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली, असेही अधिकारी सांगतात. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात असंतोषाचे वातावरण असून कारखान्याच्या परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत जखमी झालेल्या सर्व लोकांना वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत.