येरवडा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल, आरोपीवर गुन्हा दाखल

येरवडा कारागृह पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून, काही दिवसांपुर्वीच कारागृहाच्या स्वच्छतागृहात मोबाईल सापडल्याची घटना घडलेली असताना आता पुन्हा एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : येरवडा कारागृह पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून, काही दिवसांपुर्वीच कारागृहाच्या स्वच्छतागृहात मोबाईल सापडल्याची घटना घडलेली असताना आता पुन्हा एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    अश्विन आनंदराव चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंग अधिकारी अमोल जाधव (वय ३७, रा. लोहगाव) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक एक, बॅरेक क्रमांक एकमध्ये शुक्रवारी रात्री दोन वाजता घडला.

    अश्विन चव्हाण हा पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा गोळीबार करुन योगेश जगताप याचा खून केल्याप्रकरणातील आरोपी आहे. त्याने फरार काळात पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावर चाकण परिसरातील कोये येथे गोळीबार केला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपीच्या अंगावर तेथील झाड फेकून मारले होते. त्यात अश्विनसह तिघांना अटक केली होती. त्यात त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेले आहे.

    बॅरेक क्रमांक एक मधील खिडकी क्रमांक २ मध्ये मध्यरात्री २ वाजता सुरक्षा रक्षकांना एक मोबाईल आढळून आला. त्यात बॅटरी व सीम कार्ड आढळून आले. कारागृहात बंदी असतानाही हा मोबाईल अश्विन चव्हाण याने आणला असल्याचे दिसून आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.