
पुणे : हडपसर भागातील आणखी एका गुंड टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. टोळी परिसरात दहशत माजवत होती. दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी वर्षभराच्या आत तब्बल ८० टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली आहे.
तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात
बाबू नामदेव मिरेकर (वय ५४), आकाश हनुमंत कांबळे (वय २०), अमन नवीन शेख (वय २३), सरताज नबीलाल शेख (वय २०), सनी रावसाहेब कांबळे (वय २३), रोहित शंकर हनुवते (वय २२, सर्व रा. वैदुवाडी, हडपसर) अशी मोक्का कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव
वैदुवाडी परिसरात बाबू मिरेकरने टोळी तयार करुन दहशत माजविली होती. आरोपी सनी कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे आणि तीन अल्पवयीन मुलांना वैमनस्यातून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. टोळीवर खंडणी उकळणे, दहशत माजविणे, धमकावणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मिरेकर टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तयार केला होता.
मिरेकर टोळीवर मोक्का कारवाई
उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे तो प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्तावास पडताळणी केली व तो मंजुरीसाठी पोलीस आयुक्तांना पाठविला. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन मिरेकर टोळीवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.