मोदी सरकारकडून सदाभाऊ खोत यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा…

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना केंद्रीय गृहखात्याने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. गृहखात्याने यासंदर्भात मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार सदाभाऊ खोत यांना रविवारपासून वाय दर्जाची सुरक्षा प्राप्त झाली आहे. आढावा समितीची पुढील बैठक होईपर्यंत सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा लागू असेल.

    मुंबई : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना केंद्रीय गृहखात्याने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. गृहखात्याने यासंदर्भात मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार सदाभाऊ खोत यांना रविवारपासून वाय दर्जाची सुरक्षा प्राप्त झाली आहे.

    दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आढावा समितीची पुढील बैठक होईपर्यंत सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा लागू असेल, असे या पत्रात म्हटले आहे.

    वाय दर्जाच्या सुरक्षेत किती सुरक्षारक्षक असतात?

    सदाभाऊ खोत यांना पुरवण्यात येणाऱ्या वाय दर्जाच्या सुरक्षा पथकात एकूण ११ सुरक्षारक्षक असतील. यामध्ये एनएसजीचे एक किंवा दोन कमांडो आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहखात्याने अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती.

    दरम्यान सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. याबद्दल आपण केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. विशेषतः पवार कुटुंबीयांकडून मला धोका आहे. कारण, ही माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण माझा प्राण गेला तरी चालेल पण, तुमची व्यवस्था आणि मस्तावालपणे लुटीच्या माध्यमातून उभारलेला चिरेबंदी वाडा पाडल्याशिवाय हा सदाभाऊ शांत बसणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते.