इंग्रजांना बाहेर काढले तिथे ‘मोदी क्या चीज है’; शरद पवार यांचा हल्लाबोल

काँग्रेसने 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना बाहेर काढले तिथे ' मोदी क्या चीज है ' अशी जोरदार टीका करत मोदींची हुकूमशाही राजवट घालवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले.

  पुणे : इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान त्यांच्या भाषणातून देशातील सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना सांगायचे. परंतु सध्याचे पंतप्रधान हे आजही काँग्रेसने काय केले एवढेच सांगत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने विरोधकांवर खालच्या स्तरावर आरोप आणि सत्तेच्या माध्यमातून दडपशाही करण्यापलीकडे काहीच करू शकत नसल्याने हताश झाले आहेत. काँग्रेसने 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना बाहेर काढले तिथे ‘ मोदी क्या चीज है ‘ अशी जोरदार टीका करत मोदींची हुकूमशाही राजवट घालवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले.
  शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आयोजित सभेत पवार यांनी मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, डॉ. अमोल कोल्हे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
  पवार म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांच्यासारखा तरुण कन्याकुमारी ते कश्मीर पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधत आहे. त्यांचे प्रश्न समजून घेतले. यावर देखील पंतप्रधान खालच्या पातळीवर टीका करत आहेत. गांधीं नेहरू कुटुंबियांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यातुलनेत एक टक्का जरी योगदान मोदी यांनी दिले असेल तर त्यांनी सांगावे.’’
  ईडी, सीबीआयचा गैरवापर : पवार
  मोदी आणि भाजपच्या विचारांमध्ये ऐक्याची, समानतेची भावना नाही. केवळ जाती धर्मात दुफळी निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. ईडी, सीबीआय चा गैरवापर विरोधाकांवर करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात लोकशाही पद्धतीने टीका केली तर त्यांना सहन होत नाही. विरोधात बोलणारे केजरीवाल, सोरेन या सारखे मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जाते, ही हुकूमशाही आहे. त्यांचे विचार त्यांना लखलाभ, परंतु आम्हाला देश महत्वाचा आहे. यासाठी मोदींना सत्तेतून पाय उतार करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
  ‘विठ्ठल तुपे यांचे कार्य पुरोगामी विचारसरणीनुसार’
  हुकूमशाही राजवट हटवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी आताची निवडणूक महत्वाची आहे, असे नमूद करत पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.  विठ्ठल तुपे पाटील यांनी कायमच पुरोगामी विचारसरणीनुसार कार्य केले. त्यांचा ऐक्य आणि समानतेवर विश्वास होता. ही परंपरा त्यांच्या पुढील पिढीनं जपावी अशी सर्वसाधारण अपेक्षा असण्यात काही गैर नाही. परंतु सध्या तसे होताना दिसत नाही,  असा टोला शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार चेतन तुपे यांचा नामोल्लेख टाळत लगावला.