
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरले, यावरून सामना रोखठोकमधून हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग अशा शब्दांत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहे. या पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल लोकसभेचं चित्र स्पष्ट करणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळाली. दरम्यान, या निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरले, यावरून सामना रोखठोकमधून हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग अशा शब्दांत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
निवडणूक यंत्रणेवर दबाव
“काँग्रेसचे निवडणूक चिन्ह म्हणजे हाताचा पंजा. लखनौच्या एका मेळाव्यात मागे राहुल गांधी म्हणाले, ‘काँग्रेसचे चिन्ह असलेल्या हातावर मला देव आणि संत असल्याचा भास होतो.’ या विधानावर राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगात व कोर्टात भाजपने धाव घेतली होती. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री त्यांच्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरतात.”, त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव पडत असल्याचं रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
“एक तर पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारात उतरू नये व उतरले तर त्याचा संपूर्ण खर्च त्यांच्या पक्षाने करावा. निवडणूक आयोगास त्यावर मूकदर्शक बनता येणार नाही. सरकारी खर्चाने होणारा धार्मिक प्रचार, हेट स्पीच हे प्रकार आजच्या निवडणूक आयोगास खुपत नाहीत हे आश्चर्यच म्हणायला हवे.”, अशी टीका आजच्या सामना रोखठोकमधून केली आहे.
देशाला निवडणूक आयोग आहे काय?
“निवडणूक आयोगाकडून आता स्वतंत्र, निष्पक्ष निवडणुकांची अपेक्षा का करावी? बजरंग बलीचा नारा देत भाजपास मतदान करा, असे देशाचे पंतप्रधान प्रचार सभेत सांगतात. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली तर तेथील जनतेस ‘अयोध्यावारी’चा लाभ देऊ. तोही मोफत, असे देशाचे गृहमंत्री जाहीर करतात. देशाला निवडणूक आयोग आहे काय? असा प्रश्न त्यामुळे पडतो!”, असा हल्लाबोल रोखठोकमधून करण्यात आलाय.