माढ्यासाठी ‘देवगिरी-सागर’वर काथ्याकूट; मोहिते-पाटलांची फडणवीसांशी अन् रामराजेंची अजितदादांशी चर्चा

माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha) पेच सोडविण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचा बैठकींचा सिलसिला कायम आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली.

    सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha) पेच सोडविण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचा बैठकींचा सिलसिला कायम आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील आणि रामराजेंचा तीव्र विरोध आहे. मात्र, भाजपही निंबाळकरांच्या उमेदवारीवर ठाम आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

    अमोल कोल्हे यांच्या बुधवारी (दि. २७) दुपारच्या भेटीनंतर सायंकाळी पुण्यात एक लग्नात विजयसिंह मोहिते पाटील आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकत्र आले होते. त्यांच्यात अधूनमधून चर्चा सुरू होती. त्यामुळे मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटील हे बंडाचे निशाण फडकाविण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख आणि समाधान आवताडे यांना चर्चेसाठी तातडीने सागर बंगल्यावर पाचारण केले होते. माढा मतदारसंघातील तिढा सोडविण्याच्या दृष्टिकोनातून भाजकडून वेगवान हालचाली केल्या जात आहेत.

    दरम्यान, एकीकडे सागर बंगल्यावर माढा लोकसभा मतदारसंघावरून खलबतं होत असताना दुसरीकडे देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे दाखल झाले होते. रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध आहे. फलटणमधील हस्तक्षेप आणि राजकीय कुरघोडीसंदर्भात रामराजेंची तक्रार आहे, त्यामुळे अजित पवार यांच्याकडून रामराजेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

    लोकसभेच्या उमेदवारीसाठी डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील हे कमालीचे आक्रमक झाले आहेत, त्यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी तर आम्ही तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.