बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध गंभीर जखमी

  मोखाडा तालुक्यातील मौजे करोळ पैकी वावळ्याचीवाडी येथील बच्चू जिवा मिरके ( ८० ) यांना राहत्या घराजवळ दिंनाक १४ फेब्रुवारी रोजी रात्री साधारण १ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला आहे.मिरके यांना मोठ्या प्रमाणात जखमी केले आहे.

  येथील गावकऱ्यांनी तातडीने त्यांना मध्यरात्री मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ चौधरी यांनाही त्याबाबत कल्पना दिली असून वनपरिक्षेत्र अधिकारी व इतर कर्मचारी यांनीही मिरके यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करुन स्थळ पंचनामा वगैरे कायदेशीर बाबींची पूर्तता केली असून जबाब पंचनामा वरिष्ठ कार्यालयास पाठवणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.दरम्यान वावळ्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

  याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून व वनविभागाने सांगितलेली वस्तूस्थिती अशी की,मिरके हे रात्री १ वाजेच्या सुमारास लघवी करण्यासाठी घराबाहेर आले व बसून लघवी करत असतांना बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला याच त्यांच्या वरच्या ओठाला आणि कपाळावर गंभीर जखम झालेली आहे.मिरके यांचे ओरडने ऐकून घरातील माणसे बाहेर आले असता अंगावर ठिपके असलेली आकृती पळतांना आढळली असल्याने तो बिबट्याच असल्याचा प्राथमिक कयास वनविभागाने व्यक्त केला आहे.

  •नाशिक जिल्ह्यातून वावर•

  दरम्यान या भागात बिबट्याचा वावर हा नाशिक जिल्ह्यातील चंद्रेचीमेट आदि परिसरातून होत असावा असा अंदाज वनविभागाने लावलेला असून सन 2016 मध्ये चारणवाडी येथील राजू नवसू दिघा आणि दादू नवसू दिघा हे शेतकरी सकाळी आपल्या शेतात काम करत असतांना ११ च्या सुमारास बिबट्याने या दोघांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते.त्यानंतर सन २०२२ मध्ये पारध्याचीमेट येथील पार्वतीबाई साप्टे या ६५ वर्षीय वृध्देवर बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवून मानेचा लचका तोडला होता.सुदैवाने वृध्देच्या पतीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढल्यामुळे वृध्देचा प्राण वाचला होता.तत्कालीन परिस्थितीत वनविभागाने पिंजरा लावणे व सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावून बिबट्याच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला होता.तथापी वातावरण शांत झाल्यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही आणि जनजागृती थंडावल्याने ग्रामीण जनजीवन निर्धास्त झाले असले तरी बिबट्या आपल्या वावराचे ठिकाणं बदलत असल्याने तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.

  •बिबट्याची रहदारी •

  निळमाती पूर्वपट्टयात जंगल आणि कडेकपारी मोठ्या प्रमाणावर असल्याने वन्यश्वापदांचे आश्रयस्थान असल्याचा वनविभागाचा कयास आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्रेचीमेट , डहाळेवाडी , उंबाडं – बुंबाडं तर तानसा अभयारण्य पट्यात येणाऱ्या आमले , सुर्यमाळ , आदि भागातून वन्यजीवांची वहिवाट असल्याचे वनविभागाचे म्हणने असून गोंदे बुद्रुक कडून बिबट्याचा वावर हा पारध्याचीमेट येथे होत असल्याचा प्राथमिक अंदाज तत्कालीन परिस्थितीत वनविभागाने वर्तवला होता.मात्र त्यानंतरही बिबट्याने डोल्हारा, साखरवाडी भागाकडे मोर्चा वळवला होता.मात्र त्यानंतर कार्यवाही शुन्य राहिली आहे.त्यामूळे वनविभागाने तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे अशा सर्व ठिकाणी जनजागृती बरोबरच खबरदारीची उपाययोजना राबवण्याची मागणी तालुक्यातून केली जात आहे.