सराईत गुन्हेगार बिट्या कुचेकर टोळीवर मोक्का, हडपसर पोलिसांची कारवाई

हडपसर, मांजरी, शेवाळवाडी भागात दहशत माजविणार्‍या स्वप्निल उर्फ बिट्या संजय कुचेकर याच्यासह त्याच्या साथीदारांवर हडपसर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली.

    पुणे : हडपसर, मांजरी, शेवाळवाडी भागात दहशत माजविणार्‍या स्वप्निल उर्फ बिट्या संजय कुचेकर याच्यासह त्याच्या साथीदारांवर हडपसर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. टोळी प्रमुख स्वप्निल उर्फ बिट्या संजय कुचेकर (२३, रा. मांजरी), पंकज गोरख वाघमारे (२८, रा. हडपसर), हर्षल सुरेश घुले (२३, रा. मांजरी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    कुचेकर याच्यासह साथीदारांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, जबरी चोरी, छोटे व्यावसायिक, दुकानदारांना पैशांसाठी धमकाविण्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर महिन्यात मांजरी भागातून गणेश विसर्जन मिरवणूक जात होती. यावेळी फिर्यादी यांनी स्पिकरचा आवाज कमी करण्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने बिट्या कुचेकर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर लोखंडी हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी दाखल गुन्हात पोलिसांनी कुचेकर, वाघमारे, घुले यांना अटक केली होती. तर, अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले होते.

    सातत्याने कारवाई करून देखील आरोपींमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे आरोपींवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तयार केला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत हा प्रस्ताव पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला शर्मा यांनी मान्यता दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या निर्देशाखाली करण्यात आलेली ही ७७ वी कारवाई आहे. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख पुढील तपास करत आहेत.