वडगाव शेरीत दहशत माजवणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्तांची 110 वी कारवाई

वाद मिटवण्यास गेलेल्या तरुणांना मारहाण करत कोयत्याने वार करुन परिसरात दहशत पसरवणाऱ्या वडगाव शेरी परिसरातील सराईत गुन्हेगार अनुज यादव व त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार कारवाई केली.

    पुणे : वाद मिटवण्यास गेलेल्या तरुणांना मारहाण करत कोयत्याने वार करुन परिसरात दहशत पसरवणाऱ्या वडगाव शेरी परिसरातील सराईत गुन्हेगार अनुज यादव व त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार कारवाई केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ११० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली आहे.
    अनुज जितेंद्र यादव, हरिकेश टुणटुण चव्हाण (वय १८), आकाश भरत पवार (वय २३), अमोल वसंत चोरघडे (वय ३०), अक्षत निश्चल तापकिर (वय २०) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक केली असून, राहुल विनोद बारवसा (वय २३) हा फरार आहे.
    वडगाव शेरी येथील दिगंबरनगर येथे २४ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास सौरभ संतोष पाडळे (वय २२ रा. पाडळे निवास, सोमनाथनगर, वडगाव शेरी) हा व त्याचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाश पवार याच्यासोबत वाद झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी सोरभ दिगंबर नगर येथे गेला होता. त्यावेळी आकाश पवार याने सौरभ याच्या कानाखाली मारली. तर अनुज यादव याने त्याच्याकडे असलेल्या धारदार कोयत्याने ऋषिकेश याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तर इतर आरोपींनी शिवागाळ करुन ‘याना कोणालाच सोडू नका’ असे म्हणून रस्त्यावर पडलेले दगड व विटांनी मारहाण केली.
    तसेच आरोपींनी लोकांकडे हातातील कोयते दाखवून ते हवेत फिरवून कोण मध्ये आला तर सोडणार नाही, अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींकडून सातत्याने गुन्हे करत असल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्था देखील बिघडत असल्याचे दिसून आले.
    त्यामुळे या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (आयआय), ३(२), ३(४) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ राजेंद्र लांडगे यांनी परिमंडळ चारचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानूसार, शर्मा यांनी याची छाननी केली व पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार टोळीवर मोक्का कारवाई केली.