दहशत माजविण्यासाठी गोळीबार करणाऱ्या टोळीवर मोक्का; शहरातील सहा टोळ्यांविरोधात कारवाई

वारजेत (Warje)दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून (Pistul)गोळीबार करणाऱ्या गुन्हेगार टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.

    पुणे : वारजेत (Warje)दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून (Pistul)गोळीबार करणाऱ्या गुन्हेगार टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर रितेश कुमार यांनी गेल्या महिनाभरात शहरातील सहा टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई केली आहे.

    कार्तिक संजय इंगवले (वय २०), सनी बाळू शिंदे (वय २१), वैभव दत्तात्रय भाग्यवंत (वय २४, तिघे रा. रामनगर, बापुजीबुवा चौक, वारजे) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

    इंगवलेने गेल्या महिन्यात वारजेत दुचाकीस्वाराला अडवून रोकड लुटली होती. दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तुलातून गोळीबार देखील केला होता. पुणे पोलिसांकडून टोळ्यांवर कडक कारवाईचे धोरण स्विकारले आहे. त्यानूसार लूट, खंडणी, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इंगवले व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे व उपायुक्त सुहेल शर्मा यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली.