स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग; शिक्षकावर गुन्हा दाखल

यूपीएससी आणि एफवायबीकॉमच्या क्लाससाठी खासगी शिक्षकाकडे अभ्यासासाठी जाणाऱ्या एका तरुणीला घरातील कामे करण्यास भाग पाडून तिला अश्लील बोलत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : यूपीएससी आणि एफवायबीकॉमच्या क्लाससाठी खासगी शिक्षकाकडे अभ्यासासाठी जाणाऱ्या एका तरुणीला घरातील कामे करण्यास भाग पाडून तिला अश्लील बोलत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणी शिक्षकाच्या घरी शिकण्यासाठी जात होती. मॉडेल कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे.

    याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अमित सिरमनवर (वय २८, रा. मिटकॉन कॉलेजच्या मागे, बालेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत १९ वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. जून ते १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एफवायबीकॉमचे शिक्षण घेते. तसेच, यूपीएससीची तयारी देखील करते. तिने आरोपीकडे खासगी शिकवणी लावली होती. तो यूपीएससीची तयारी करून घेत होता. दरम्यान क्लासमध्ये आल्यानंतर शिक्षक या तरुणीला घरातील कामे करायला लावत होता. काम न केल्यास प्लास्टिकच्या छडीने तिला मारहाण करत असत. तसेच, तिला अश्लील भाषेत बोलत तिचा वारंवार विनयभंग केल्याचे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सुरू आहे.