सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेला पालघर जिल्ह्यात पैसे वाटप तरीही खुर्च्या रिकाम्याच

पालघर लोकसभा मतसंघाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेला नागरिकाने यावे यासाठी ५०० रुपये देण्यात येतील असे सांगितले होते.

    पालघर : 20 जून रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रचाराची जय्यत तयारी आणि ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याच संदर्भात पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा (Dr. Hemant Savara) यांच्या प्रचारासाठी सातपाटी येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पाचशे रुपये पर माणूस देऊनही खुर्च्या रिकाम्याच राहिल्याने मंत्री महोदयांना आणून काय साध्य झाले अशी चर्चा सातपाटी गावात रंगली होती.

    पालघर जिल्ह्याच्या कोळी महासंघाने सातपाटी येथे कोळी बांधवांसाठी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या बरोबर संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या सभेसाठी सुधीर मुनगंटीवार सातपाटी येथे आले होते. त्यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील, राणी द्वीवेदी, संतोष जनाठे, राजन मेहेर, सरपंच सीमा भोईर, सुनील सिंग आदी उपस्थित होते.

    मच्छीमार समाजाच्या बरोबर संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेचे कोळी महासंघाने आयोजन केले होते. कार्यक्रमाला साधारण दोन अडीच हजार लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आयोजकांना होती. मात्र 35000 लोकसंख्येच्या सातपाटी गावात त्या सभेला साधारण 400 च्या आसपास मच्छीमार उपस्थित राहिले होते. गर्दी जमवण्यासाठी काहींना सभेला प्रत्येकी पाचशे रुपये देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र पैसे देण्यात न आल्याने एकाने थेट मंचावरच घुसखोरी केल्यावर पोलिसांनी त्याला मंचावरून खाली उतरले. त्यांनी एकूण 15 माणसांना सभेसाठी आणले होते. आज सांगितल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत म्हणून त्याने मंचावर गेल्याचे पत्रकारांना सांगितले.