msrtc bus photo

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या (Free Travel From ST Bus) सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती.

    मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (75th anniversary Of Indian Independence) राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास (Free Travel) करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर एसटी प्रवासाला ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. महाराष्ट्र राज्यात २६ ऑगस्ट २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान केवळ ८७ दिवसात २ कोटी ०८ लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली.

    राज्यात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट, २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा २६ ऑगस्टपासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

    या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान राज्यभरातून २ कोटी ८ लाख ६५ हजारांहून अधिक म्हणजे दररोज सरासरी २ लाख ३९ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे . प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे चन्ने म्हणाले.