आळंदीत चारशेहून अधिक दिंड्या दाखल; माउलींच्या समाधी दर्शनासाठी रांगेतील भाविकांना चार तासाचा कालावधी

आळंदीत पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या पादुकांसह संत नामदेवराय, पुंडलिकराय यांच्या पालखीसह राज्यभरातून ४०० हून अधिक दिंड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे माउलींच्या समाधी दर्शनासाठी रांगेतील भाविकांना तब्बल चार तास लागत आहे.

  पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वैष्णवांची मांदियाळी चार दिवसांपासून अलंकापुरीत येत आहेत. आळंदीत पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या पादुकांसह संत नामदेवराय, पुंडलिकराय यांच्या पालखीसह राज्यभरातून ४०० हून अधिक दिंड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे माउलींच्या समाधी दर्शनासाठी रांगेतील भाविकांना तब्बल चार तास लागत आहे.

  कार्तिकी वारीतील मुख्य एकादशी सोहळा शनिवारी (दि. ९) तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि घराण्यातील परंपरेने चालत आलेली आपली वारी माउली चरणी समर्पित करण्यासाठी वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. माउलींच्या चलपादुकांवर दिवसभरात भाविकांच्या वतीने साडेपाचशे महापूजा करण्यात झाल्या.

  आळेफाटा येथून रेड्याची पालखीही आली. यासह वासकर, शिरवळकर, टेंभूकर, उखळीकर, शिवणीकर, गुरुजीबुवा राशीनकर या मोठ्या फडकरी दिंडीकरी महाराजांच्या दिंड्यांचे आगमन झाले. पंढरपुरातून ६० तर मुळशी, मावळ, आंबेगावातून ६० हून अधिक दिंड्या दाखल झाल्या.

  पोलिसांचा बंदोबस्त

  महाद्वारातून इंद्रायणीकडे जाण्यासाठी एकेरी पद्धतीने रस्ता खुला असून, इंद्रायणीकडून शनी मंदिरमार्गे येण्यासाठी रस्ता बंद आहे. देऊळवाड्याकडे येण्यासाठी चारचाकी गाड्यांना मज्जाव केला आहे. देऊळवाडा भाविकांच्या गर्दीने गजबजला आहे. मंदिर आणि महाद्वारात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. शहरात चोरांपासून सावध राहण्यासाठी, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि सावधानतेच्या सूचना करण्यासाठी ध्वनिक्षेपकाची पोलिसांकडून सोय केली आहे.

  शहरातील सर्व अतिक्रमणे काढली जात आहेत. प्रदक्षिणा रस्ता आणि मद्वाराकडे येणारे रस्ते देहूफाटा परिसरात पालिका आणि पोलिस वारंवार फिरून अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेत आहेत. वारी काळासाठी पालिकेने जागा तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने, लिलावाने दिल्या आहेत. त्यापोटी पंधरा लाख एकोणतीस हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

  - कैलास केंद्रे, मुख्याधिकारी