बोंडारवाडी धरणाचा अहवाल एका महिन्यात द्या; बच्चू कडूंचे अधिकाऱ्यांना आदेश

जावली तालुक्यातील ५४ गावांना पिण्याचे पाणी व सिंचनासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा पिण्यासाठी व सिंचनासाठीचा अहवाल तातडीने एक महिन्यात सादर करावा, असे आदेश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

    केळघर : जावली तालुक्यातील ५४ गावांना पिण्याचे पाणी व सिंचनासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा पिण्यासाठी व सिंचनासाठीचा अहवाल तातडीने एक महिन्यात सादर करावा, असे आदेश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

    शिवसेना नेते पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व सातारा जिल्ह्याचे माजी संपर्कप्रमुख माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात बच्चू कडू यांच्या दालनात बोंडारवाडी धरणासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली.

    या बैठकीला माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सातारा विधानसभा क्षेत्र प्रमुख एस. एस. पार्टे गुरुजी, संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, कराड उत्तर संपर्कप्रमुख शंकर सपकाळ, शिव सामर्थ्य सेना सरचिटणीस जितेंद्र दादा सपकाळ, तालुका संपर्क प्रमुख नामदेव बांदल, तालुकाप्रमुख नितीन गोळे, शिव सहकार सेना जिल्हाध्यक्ष संदीप पवार, शिवसेना शहर प्रमुख सचिन जवळ, उपतालुका प्रमुख चंद्रकांत धनावडे, बाळासाहेब शिर्के, शांताराम कदम, संतोष चव्हाण, लहूराज सुर्वे, सचिन शेलार व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    बोंडारवाडी धरण पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी व्हावे, या संदर्भात शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात बोंडारवाडी धरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली.