अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा आईनेच केला खून; खानापुरातील घटना

अनैतिक प्रेमसंबंधात (Immoral Relations) अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा खळबळजनक प्रकार लेंगरे (ता. खानापूर) येथे उघडकीस आला. सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण (Boy Kidnapped) झाल्याचा बनाव निर्दयी मातेने केला होता.

    सांगली : अनैतिक प्रेमसंबंधात (Immoral Relations) अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा खळबळजनक प्रकार लेंगरे (ता. खानापूर) येथे उघडकीस आला. सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण (Boy Kidnapped) झाल्याचा बनाव निर्दयी मातेने केला होता. एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी कसून तपास करून खरा प्रकार उघडकीस आणला.

    विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय 28, रा. लेंगरे) व तिचा प्रियकर रूपेश नामदेव घाडगे (वय 25, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हिचे लग्न झाले असून, शौर्य हा सहा वर्षांचा मुलगा आहे. ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतु, या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी निर्दयपणे त्याचा काटा काढायचे ठरवले. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. तर इकडे रूपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते.

    मृतदेह तरंगताना दिसला अन्…

    विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रूपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.