दंड कमी करण्यासाठी वाहनचालकांचा उस्फूर्त प्रतिसाद; तडजोडीत १७०० वाहनचालकांचा दंड कमी

वाहतूक नियमभंगाचा थकीत दंड कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पडेस्कला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. हेल्प डेस्कच्या माध्यमातून आतापर्यंत १ हजार ७०० वाहनचालकांचा दंड कमी केला आहे.

    पुणे : वाहतूक नियमभंगाचा थकीत दंड कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पडेस्कला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. हेल्प डेस्कच्या माध्यमातून आतापर्यंत १ हजार ७०० वाहनचालकांचा दंड कमी केला आहे. पोलिसांचे हेल्पडेस्क (मदत केंद्र) ८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

    पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून (दि. ९ सप्टेंबर) लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीत तडजोडीने प्रलंबित खटले तडजोडीने मार्गी लावण्यात येतात. पुणेकरांवरील वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे तसेच वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरू केली आहे.

    वाहन चालकांसाठी सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत मदत केंद्राचे कामकाज येरवडा येथे वाहतूक शाखेच्या कार्यालयात सुरू राहणार आहे. प्रलंबित खटला, थकीत दंडाची रक्कम कमी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. वाहन चालकांना दंडाच्या रकमेतून सूट देण्यात येणार आहे.

    हेल्पडेस्कला न्यायालयातील पॅनल असेल. थकीत दंड कमी करुन घेण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणावी, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.