maratha-reservation

खटाव तालुक्यातील पाचवड येथील ग्रामदैवताचा यात्रा उत्सव आहे. गुरुवारी (दि.16) या यात्रेचा मुख्य रथ सोहळा संपन्न होणार आहे. या रथ सोहळ्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व खटाव-माणचे आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित राहणार असल्याचे समजते.

    मायणी : खटाव तालुक्यातील पाचवड येथील ग्रामदैवताचा यात्रा उत्सव आहे. गुरुवारी (दि.16) या यात्रेचा मुख्य रथ सोहळा संपन्न होणार आहे. या रथ सोहळ्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व खटाव-माणचे आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित राहणार असल्याचे समजते.

    सध्या मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. याच दिवशी मायणी (ता.खटाव) येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा आहे. या निमित्ताने मायणी येथे लाखोंच्यावर मराठा समाज उपस्थित राहणार आहे.

    राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी सदर रथ सोहळ्यासाठी उपस्थित राहू नये. जर उपस्थित राहिले तर त्यांना पाचवड गावामधून बाहेर जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा मायणी व परिसराच्या मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख यांनी दिला आहे. जर ते या रथ सोहळ्यासाठी उपस्थित राहिले तर होणाऱ्या परिणामास त्यांना सामोरे जावे लागेल.

    आज कोणताही राजकीय नेता गावोगावी प्रवेश बंदी असल्याने जात नसताना खासदार व आमदार मुद्दाम सदर कार्यक्रमासाठी येत असल्याची भावना सकल मराठा समाज बांधवांमध्ये निर्माण झाली असून, या रोषास त्या दोघांना सामोरे जावे लागेल.

    पाचवड ग्रामस्थांनी देखील या बाबीची गंभीर दखल घेऊन त्यांना सदर रथ सोहळ्यासाठी पाचारण करू नये. तसेच याची पोलीस विभागाने देखील नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन डॉ. विकास देशमुख यांनी केले आहे.