संजय राऊत म्हणाले, ‘मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर, मला वाटतं…’

शिवसेनाबाबत निवडणूक आयोगाकडून घेतलेला निर्णय हा केंद्र सरकारच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि ईडी भाजपचे पोपट आहे. तसेच सत्ता आणि पैशाच्या जोरावर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखा घेण्यात येत आहेत.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘मराठा विरुद्ध (Maratha Reservation) ओबीसी मुद्द्यावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर सुरु आहे. मला तर वाटतं एखादा मंत्री बैठकीत मार खाईल, असं वातावरण आहे’, असे म्हटले आहे.

    संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘शिवसेनाबाबत निवडणूक आयोगाकडून घेतलेला निर्णय हा केंद्र सरकारच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि ईडी भाजपचे पोपट आहे. तसेच सत्ता आणि पैशाच्या जोरावर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखा घेण्यात येत आहेत. यावरून हे काय मुघलांचे राज्य आहे का?, असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले.

    तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असूनही पक्ष अजित पवार यांना दिला जातो. असे वक्तव्यही संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात केले. राज्यात राजकीय सुडापायी अनेकांवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यावर ईडीची टांगती तलवार आहे. यावरून भाजप हरते तिथे ईडी जाते, असेही त्यांनी म्हटले.

    मुख्यमंत्र्यांचं सध्या नियंत्रण नाही

    मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर सुरु आहे. मला तर वाटतं एखादा मंत्री बैठकीत मार खाईल, असं वातावरण आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून जातात. यापूर्वी राज्यात कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या सगळ्यावर कोणतंही नियंत्रण नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.