पंतप्रधान मोदींचा मुंबईतील घाटकोपर येथे रोड शो; संजय राऊत यांनी टीका करत म्हटलं…

पंतप्रधान मोदी यांचा मुंबईतील घाटकोपरमध्ये मोठा रोड-शो होणार आहे. त्यांच्या रोड-शोची प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मोदींच्या रोड-शोच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात झाली आहे.

    मुंबई : मुंबईत जिथे होर्डिंग दुर्घटना झाली तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा रोड शो होत आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडले. ‘या घटनेला दोन दिवस होत नाहीत, तोच ते रोड शो करायला येत आहेत. मोदी हे घटनास्थळी गेले तर ते मगरीचे अश्रू ढाळतील. ते एक नौटंकी करणारे व्यक्ती आहेत’, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली.

    पंतप्रधान मोदी यांचा मुंबईतील घाटकोपरमध्ये मोठा रोड-शो होणार आहे. त्यांच्या रोड-शोची प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मोदींच्या रोड-शोच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरेकेटिंग करायला सुरुवात झाली आहे. पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त असणार आहे.

    याच रोड शो वरून संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांना राज्यात रोड शो करण्याची गरज भासते म्हणजे राज्यात महाविकास आघाडीने आणि देशात इंडिया आघाडीने पंतप्रधान मोदी यांना रस्त्यावर आणले आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती भाजपवाले पंतप्रधानांना फिरवत आहेत. त्यांना पराभवाची भीती वाटत असल्यानेच पंतप्रधानांवर रस्त्यांवर रोड शो करण्याची वेळ आली आहे’.

    दरम्यान, पंतप्रधान मोदींचा रोड शो असल्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीत सुरक्षेची खबरदारी मुंबई पोलिसांकडून आतापासून घेतली जात आहे. ज्या उंच इमारती आहेत तिथे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या ज्या फांद्या अडसर ठरत होत्या त्या मुंबई महापालिकेच्या वतीने तोडण्यात आल्या आहेत.