श्रीनिवास पाटील यांची लोकसभेतून माघार; शरद पवार कोणाला देणार संधी

विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

    सातारा : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली असल्याने राज्यामध्ये नवनवीन समीकरणे समोर येत आहेत. साताऱ्याच्या लोकसभा निवडणूकीला देखील नवीन वळण आले आहे. विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला धक्का बसला आहे. शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

    विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट नकार दिला आहे. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणावरुन श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे. आता सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची, हा पेच शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील उभे राहिल्यास त्यांचं काम करु अन्यथा शरद पवारांनी इथून उभं राहावं अशी मागणी केली आहे.

    शरद पवार सातारा दौऱ्यावर

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. ते निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेत असून कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. दरम्यान सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यामुळे शरद पवार यांच्यापुढे उमेदवार कोण हा पेच निर्माण झाला आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी उभं राहावं, अशी इच्छा होती. पण त्यांनी प्रकृतीचे कारण देत उमेदवारी घेण्यास नकार दिला. माझ्याकडून मतदारांना न्याय देता येणार नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही”, असे सांगितले असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. सातारा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत कार्यकर्त्यांनी काही सूचना करत नावे सूचवली आहेत. यावर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करून एक ते दोन दिवसांत निर्णय घेऊ, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.