खासदार सुळेंचा भाजपवर भ्रष्ट जुमलाबाज पार्टी म्हणत पुन्हा आरोप ; बारामतीत धनगर आरक्षण आंदोलक चंदकांत वाघमोडें ची घेतली भेट

    बारामती: धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे, या मागणीशी आपला व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून धनगर आरक्षणासह मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न आपण सरकारला विचारले असल्याचे सांगत केंद्रातील भाजप सरकार मधील नेत्यांनी त्याला विरोध केला असल्याचा आरोप करत भाजपवर भ्रष्ट जुमला पार्टी असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी करून एकनाथ शिंदे यांच्या ट्रिपल इंजिन सरकारने धनगर आरक्षणाबात विशेष अधिवेशन बोलवावे, केंद्रातील या मंत्री मुंडा यांची भेट घेऊन आपण याबाबत चर्चा करु,असे आश्वासन खासदार सुळे यांनी यावेळी आंदोलकांना दिले.

    धनगर समाजाला एसटी आरक्षण तात्काळ लागू करावी या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी बारामती शहरातील प्रशासकीय भवन समोर आमरण उपोषण सुरू केले आहे, या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सेक्रेटरी यांच्याशी फोनवरून चर्चा करून या आंदोलनाची माहिती दिली. वाघमोडे यांच्याशी चर्चा करताना खासदार सुळे यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. आपण लोकसभेमध्ये धनगर आरक्षणाबाबत अनेक वेळा प्रश्न विचारले आहेत, मात्र भाजपमधील काही खासदारांनी या आरक्षणाला विरोध केला आहे. या आरक्षणाबाबत शिंदे सरकारने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्याची गरज आहे. यासाठी तात्काळ एक दिवसाचे अधिवेशन बोलवावे. केंद्रात या आरक्षणाचा प्रश्न आल्यास आम्ही राष्ट्रवादीचे खासदार त्याला पाठिंबा देत हा प्रश्न उचलून धरू. धनगर समाजासह मराठा लिंगायत आणि मुस्लिम या समाजाला देखील आरक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे. सध्या दिवाळीचा सण असल्याने चंद्रकांत वाघमोडे यांनी उपोषण चार दिवसांसाठी स्थगित ठेवून या चार दिवसात निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करावे, अशी भूमिका मांडली. मात्र वाघमोडे पाटील यांनी सरकारमधील कोणताही जबाबदार अधिकारी पाच दिवस आंदोलन सुरू होऊ नये या ठिकाणी आला नसल्याचे सांगत, जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचे सांगितले. गेली 70 वर्षापासून धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे चंद्रकांत वाघमोडे यांनी यावेळी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणाहून मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव यांच्याशी मोबाईल वरून चर्चा करून आंदोलनाची तीव्रता स्पष्ट केली. या आंदोलनाबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तात्काळ चर्चा करून ही माहिती देऊन आंदोलक‌ चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी चर्चा करण्याबाबत शिष्टमंडळ पाठवावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली. यानंतर चंद्रकांत वाघमोडे यांच्या समर्थनार्थ आलेल्या धनगर समाजातील शिष्टमंडळाशी खासदार सुळे यांनी यावेळी संवाद साधला. यामध्ये बापुराव सोलनकर , कल्याणी वाघमोडे,शशिकांत तरंगे, नवनाथ पडळकर, घनश्याम हाके, अभिजीत देवकाते,वैभव सोलनकर आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले. खासदार सुळे यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर उत्तर देत आपण धनगर समाज आरक्षणासाठी आग्रही असल्याचे सांगत कायम आपण धनगर समाजासोबत असल्याची ग्वाही देत हा प्रश्न लोकसभेमध्ये उचलून धरु,अशी ग्वाही यावेळी दिली. दरम्यान आमदार अतुल बेनके यांनी धनगर आरक्षणाला विरोध केला असल्याचा प्रश्न घनश्याम हाके यांनी उपस्थित केल्यानंतर आपण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने असल्याचे खासदार सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. याच वेळी खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी मोबाईल वरून चर्चा करून धनगर आरक्षणाच्या प्रश्नाबाबत आपण वडील एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा‌ करून आंदोलक चंदकांत वाघमोडें शी चर्चा करण्याबाबत शिष्टमंडळ पाठवावे,अशी विनंती केली.यावेळी त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी देखील मोबाईल वरून चर्चा करून धनगर आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा बँकेचे माजी संचालक मदनराव देवकाते आदींसह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मै गिरगिट नही….

    मराठा धनगर व मुस्लिम आरक्षणाबाबत आपण नेहमीच आग्रही असून यासंदर्भात सर्वाधिक प्रश्न आपण लोकसभेत उपस्थित केले आहेत. त्यामुळे शब्द मी कधीही बदलणारी नाही,असे स्पष्ट करताना मै गिरगिट नही हु… जे मी बोलते तोच शब्द माझा शेवटपर्यंत असतो, शब्द बदलणारे केंद्रातील सत्तेत आहेत, भ्रष्ट जुमलाबाज पार्टी असा उपरोधिक उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी करत भाजपवर थेट निशाणा साधला.