gramsadak yojana in raigad tatkare

  अलिबाग: प्रधानमंत्री ग्रामसडक याेजना (Pradhanmantri Gramsadak Yojana) टप्पा -3 मधील तब्बल 48 कोटी रुपयांच्या कामांना केंद्रीय मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील दहा ग्रामीण भागातील रस्त्यावरील (Road Work In Raigad) वाहतूक सुसाट हाेणार आहे, अशी माहिती रायगडचे खासदार सुनिल तटकरे  (Sunil Tatkare) यांनी अलिबाग येथे दिली.

  महाराष्ट्रावरचा अन्याय झाला दूर
  गेल्या तीन वर्षांपासून प्रधानमंत्री ग्रगामसडक याेजनेचा निधी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आला नव्हता. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षीय 40 खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांची दिल्लीतील कृषीभवनात भेट घेतली. राज्यातील या प्रश्नाबाबत त्यांनी पाेटतीडकीने प्रश्न मांडला हाेता. महाराष्ट्र राज्यावरच अन्याय का केला जाताे, असा सवाल विचारण्यात आला हाेता. सर्वांच्या प्रयत्नाने केंद्रीय राज्यमंत्री निरंजन देवी यांनी प्रधान मंत्री ग्राम सडक याेजना-3 मधील निधी देण्याला मान्यता दिली. त्यानुसार रायगड जिल्ह्याच्या वाट्याला तब्बल 48 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. याबाबतची विकास कामे लवकरच सुरु हाेणार आहेत, असे खासदार तटकरे यांनी सांगितले.

  रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड,म्हसळा, पेण, महाड, राेहा तालुक्यात प्रत्येकी एका कामाला मान्यता मिळाली आहे. तसेच सुधागड आणि पाेलादपूर तालुक्यातील प्रत्येकी दाेन कामांचा समावेश असल्याकडे खासदार तटकरे यांनी लक्ष वेधले. अद्यापही निधीमध्ये वाढ करण्याबाबत 2 फेब्रुवारी 23 राेजी बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  आरसीएफ विस्तारीकरण
  अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनी 900 काेटी रुपये खर्च करुन प्रस्तावित प्रकल्पाचे विस्तारीकरण करणार आहे. त्याबाबतची पर्यावरणीय जन सुनावणी काही राजकीय आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रद्द करावी लागली हाेती. ही सुनावणी वेळेत न घेतल्यास हा प्रकल्प गुजरातच्या राज्यात जाण्याची शक्यता आरसीएफच्या अधिकाऱ्यांनी बाेलून दाखवली आहे. ते मात्र आपल्याला परवडणारे नाही. प्रकल्पात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधेले.

  अलिबाग,मुरुड,श्रीवर्धन, उरण तालुक्यातील मच्छिमारांचे प्रश्न साेडवण्याबाबत केंद्रीय मंत्री पुरुषाेत्तम रुपाला यांच्यासाेबत बैठक घेण्यात आली आहे.त्यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

  मुंबई-गाेवा महामार्ग
  मुंबई-गाेवा महामार्गावरी खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या मार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.

  अपघातग्रस्तांना मदत
  राज्यात काेठेही अपघात झाल्यावर त्यातील मृतांच्या वारसांना राज्य सरकार आर्थिक मदत देते. मात्र रायगडसह काेकणात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मदत दिली जात नसल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार आहे. अन्य ठिकाणी मदत दिली जात असेल हे चांगलेच आहे, मात्र काेकणात हाेणाऱ्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत देण्याबाबत मागणी करणार असल्याचेही खासदार तटकरे यांनी सांगितले.

  काेकण शिक्षक मतदारसंघ
  काेकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे, अशी खात्री असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.