supriya sule

लोकसभेत २०२१ मध्ये नितीन गडकरी यांच्याकडे या पुलाबाबत चर्चा केल्यावर या मार्गाच्या काही भागावर उपाययोजना करण्यात आली. मात्र खूप सुधारणा होणं बाकी असल्याने अपघाताचं प्रमाण कमी झालं नाही, असं मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केलं आहे.

    पुणे: नवले पुलावरील (Navale Bridge Accident) अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करणार असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं आहे. पुण्यातील (Pune) नवले पुलावरील अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी रस्त्याची रचना नीट करुन महापालिकेकडून फूटपाथ, सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने बांधले जावे अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.

    या मार्गावर अपघात का होतात ? याची योग्य माहिती घेऊन तज्ञांच्या मदतीने त्रुटी दूर करायला हव्यात. अपघात सातत्याने होत असेल तर त्यावर उपाययोजना करुन अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी लक्ष द्यायला हवं, असंही त्या म्हणाल्या.

    लोकसभेत २०२१ मध्ये नितीन गडकरी यांच्याकडे या पुलाबाबत चर्चा केल्यावर या मार्गाच्या काही भागावर उपाययोजना करण्यात आली. मात्र खूप सुधारणा होणं बाकी असल्याने अपघाताचं प्रमाण कमी झालं नाही. पुणे महापालिकेने या मार्गावर सर्व्हिस रोड नसल्याने अनेक अपघात होतात. त्यासोबतच या पुलावर तीव्र उतार आहे. आतापर्यंतच्या अपघाताला हा उतार कारणीभूत ठरला आहे. यावर पालिकेने उपाययोजना करायला हवी. शिवाय ज्या जागी सातत्याने अपघात होत आहे. या ठिकाणांचं निरीक्षण करुन ते निश्चित करायला हवेत. हा उतार कसा कमी करता येईल, यावर रोड एक्स्पर्टकडून माहिती घेऊन उपाययोजना करायला हव्यात, असं त्यांनी म्हटलं आहे.

    या पुलाच्या विषयासंदर्भात पोलीस आयुक्त, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त देखील या अपघातस्थळी भेट देणार आहेत. हे सगळे मिळून या परिसराची पाहणी करतील. त्यानंतर त्रुटी नोंदवून नितिन गडकरींशी चर्चा करणार आहोत.

    पुण्यातील नवले ब्रीज परिसरात झालेला अपघात दुर्दैवी आहे. या अपघाताबाबत मी सातत्याने प्रशासन, पोलीस व मदत यंत्रणांच्या संपर्कात आहे. या अपघातात जखमी झालेल्या सर्वांना योग्य उपचार मिळतील याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलीस, फायर ब्रिगेड, महापालिका आणि डॉक्टर्स यांनी तातडीने धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत पोहोचवली, त्याचे आभार मानले आहेत. या घटनेतील जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होऊन घरी सुखरुप परत याव्यात, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे.