राजेंच्या नाराजींवर महाजनांची शिष्टाई; खासदार उदयनराजे यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन जलमंदिरवर

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सुमारे ४० मिनिटे बंद दाराआड खलबते झाली.

  सातारा : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला असताना अद्याप साताऱ्याच्या उमेदवारीवरून भाजपने कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. त्यामुळे उदयनराजे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सुमारे ४० मिनिटे बंद दाराआड खलबते झाली .

  सातारा लोकसभेचे तिकीट छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळू नये, यासाठी भाजपमधूनच अंतर्गत विरोध होत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वी राजे समर्थकांनी केला होता. मात्र मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही, असे वक्तव्य करून उदयनराजे यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सूचकपणे सांगितले होते. महाविकास आघाडी-महायुती यांचे उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर होत असताना साताऱ्यात मात्र कोणत्याच आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन व उदयनराजे भोसले यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

  दुपारी बाराच्या दरम्यान महाजन यांचे जलमंदिर येथे आगमन झाले. उदयनराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राथमिक चर्चेनंतर उदयनराजे व महाजन यांच्यामध्ये कमराबंद खलबते झाली, मात्र कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. साताऱ्यासह राज्यात दोन्ही नेत्यांमध्ये काय नक्की चर्चा झाली, याविषयी प्रचंड उत्सुकता होती. उदयनराजे यांनी राज्यव्यापी प्रचार दौऱ्यामध्ये जोर लावावा, अशी गळ महाजन यांनी उदयनराजे यांना घातल्याची माहिती आहे.

  पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला अडचणी उद्भवल्यास शिष्टाई करण्याच्या मोहिमेवर सध्या महाजन आहेत. माढा दौऱ्यावरून ते थेट साताऱ्यात दाखल झाले. माढा लोकसभा मतदारसंघातही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकीट देण्यात आल्याने फलटण व माळशिरस तालुक्यामध्ये नाराजी आहे. तेथील चर्चेनंतर महाजन यांनी थेट उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही शिष्टाई कितपत यशस्वी होणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

  तिकिट नाही, असे कोण म्हणाले?

  पार्लमेंटरी बोर्डाच्या तिसऱ्या यादीत नक्कीच नाव जाहीर होईल. महाराष्ट्रात भाजपला राज्याच्या प्रचार यंत्रणेत उदयनराजे यांचा कसा उपयोग करून घेता येईल, यासाठी मी चर्चा करण्यासाठी आलो आहे. येथे कोणताही तिढा नाही. महायुतीत तीन घटक पक्षाचे सरकार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सातारा व माढा येथे उमेदवारीची ताणाताण सुरू आहे. उदयनराजे यांना तिकिट देणार नाही, असे कोणी सांगितले असा प्रतिप्रश्न महाजन यांनी पत्रकारांना केला.

  उमेदवारीचा कोणताही तिढा नाही

  साताऱ्यात उमेदवारीचा कोणताही तिढा नाही. उदयनराजे यांचा लौकिक देशभर आहे. त्यांना तिकिट मागण्याची गरजच नाही. भाजपच त्यांना तिकिट देईल, अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी जलमंदिर येथील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.