MPDA action against terrorizing pune criminals
MPDA action against terrorizing pune criminals

    पुणे : कोंढवा तसेच धनकवडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. त्यांना एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तांची ही ५७ वी कारवाई आहे.

    यासारखे गंभीर गुन्हे दाखल

    ईश्वर दत्ता चव्हाण (वय २७ रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
    ईश्वर चव्हाण कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने कोंढवा व मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली होती. त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकू, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

    आरोपी ईश्वर चव्हाणला स्थानबद्ध

    गेल्या ५ वर्षात त्याच्यावर ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. आरोपी ईश्वर चव्हाणला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी पोलीस आयुक्त यांना पाठवला होता.

    एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश

    पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ईश्वर चव्हाण याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. तर, धनकवडी भागात दहशत माजविणाऱ्या विकास उर्फ विकी रोहिदास फुंदे (वय ३६, रा. चव्हाणनगर, धनकवडी) याच्यावरही कारवाई केली आहे. फुंदेविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तयार केला होता. संबंधित प्रस्तावाला पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली.

    पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगिरी
    पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. तर, बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांवर मोक्का, तडीपार व एमपीडीएसारख्या कारवाया सुरू केल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यापासून १० महिन्यात दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत ५७ जणांवर स्थानबद्धतेची तर, ८१ टोळ्यावर मोक्काची कारवाई केली आहे.