
संपूर्ण राज्यभरातील वीज ग्राहकांकडे आता स्मार्ट प्रीपेड मीटर (Smart Prepaid Meter) लागणार आहेत. याचे कंत्राट सुद्धा अदानीसह एकूण 4 कंपन्यांना मिळाले असून, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर झोनमध्ये मॉन्टेकार्लो कंपनीच्या माध्यमातून एकूण 30 लाख 30 हजार 346 नवीन स्मार्ट मीटर लागणार आहेत.
शेडेश्वर : संपूर्ण राज्यभरातील वीज ग्राहकांकडे आता स्मार्ट प्रीपेड मीटर (Smart Prepaid Meter) लागणार आहेत. याचे कंत्राट सुद्धा अदानीसह एकूण 4 कंपन्यांना मिळाले असून, चंद्रपूर, गोंदिया व नागपूर झोनमध्ये मॉन्टेकार्लो कंपनीच्या माध्यमातून एकूण 30 लाख 30 हजार 346 नवीन स्मार्ट मीटर लागणार आहेत. मात्र, यामुळे मीटर रीडिंग, देयके वाटपसारखे काम करणाऱ्यांची गरज भासणार नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हजारो कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीचे विघ्न ओढविण्याची शक्यता आहे.
पूर्वी वीज वापरानंतर त्याचे देयके भरा, अशा पद्धतीने वीज वितरण कंपनीच्या मीटरची सवय ग्राहकांना जडलेली होती. त्यातही आधी तिमाही बिल यायचे. कालांतराने आजपर्यंत महिन्याकाठी विजेचे बिल थेट घरी धडकते. मात्र, आता मोबाईलप्रमाणे रिचार्ज करणारे ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ लागणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या मीटरमुळे वीज वसुली, मीटर रीडिंग, देयके वाटप सारख्या कामांना पूर्णविराम लागणार असल्याने त्याच्या खर्चाची बचत होणार असल्याचे सांगितले जाते. तरी यामुळे राज्यातील हजारो बेरोजगारांच्या हाताचे काम हिरावले जाणार आहे.
एकीकडे आधीच बेरोजगारी वाढत असताना हाताचे काम हिसकावले जात असल्याने कंत्राटी कामगारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. स्मार्ट मीटर संदर्भात रिचार्ज संपताक्षणी विद्युत प्रवाह बंद होणार का?, नवा रिचार्ज भरेपर्यंत काही मुदत मिळेल? कसे आणि किती रुपयांचे रिचार्ज किंवा देयके राहणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याने जनतेमध्ये या स्मार्ट मीटर संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.