मुक्ता टिळक अनंतात विलीन; पुण्यामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कसबा मतदार संघाच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांना आज पुणेकरांनी निरोप दिला. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार झाले. मुक्ताताईंच्या अंत्यसंस्कारावेळी पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

    पुणे : कसबा मतदार संघाच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना आज पुणेकरांनी निरोप दिला. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) झाले. मुक्ताताईंच्या अंत्यसंस्कारावेळी पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. पुण्याच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. नगरसेविका, महापौर (Mayor) किंवा आमदार (MLA) म्हणून त्यांचा जनसामान्यांशी मोठा संपर्क होता, मुक्ताताई जाण्याने आमच्या पक्षाची आणि समाजाची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताताईंना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, मुक्ताताई या संघर्षशील व्यक्तिमत्व होत्या. टिळकांचा संघर्षाचा वारसा त्यांच्यात होता. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर विधानसभा हळहळली. कार्यकर्ता कसा असतो, पक्षादेश काय असतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच मुक्ताताई. गंभीर आजाराने ग्रासलेले असतानाही त्या राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या.

    मुक्ता टिळक यांच्या अंत्यदर्शनसाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रवीण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

    एअर ॲम्बुलन्सने मतदानाला हजेरी
    मुक्ता टिळक (वय ५७) यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीवेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअर ॲम्बुलन्सने नेण्यात आले होते.