coastal road tunnel

मुंबई (Mumbai) किनारा रस्ता (Coastal Road) प्रकल्पातील पॅकेज ४ अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी १ अशा एकूण २ बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते ‘मलबार हिल’च्या खालून जाणार आहेत.

    मुंबई: मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यातील पहिल्या बोगद्याचा २ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे.तर उर्वरित ७० मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या १० दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे.कोस्टल रोड प्रकल्‍पाचे काम वेगाने सुरू असून प्रकल्‍पाचे जवळपास ५० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तर हा संपूर्ण प्रकल्‍प डिसेंबर, २०२३ मध्‍ये पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मुंबई महापालिकेने (BMC)  म्हटले आहे.

    मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील पॅकेज ४ अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी १ अशा एकूण २ बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते ‘मलबार हिल’च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढया खोलीवर करण्यात येत आहे. यातील बोगदे खणन ११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्क येथून करण्‍यात आली होती. तर या बोगद्याचा एक किलोमीटरचा टप्‍पा ४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला. तर २ किलो‍मीटरचा टप्‍पा २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला आहे. पहिल्‍या बोगद्यासाठी उर्वरित ७० मीटर खणन बाकी असून ते येत्या १० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.दरम्यान या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्‍येकी २.०७० किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा १२.१९ मीटर आहे. या बोगद्यांचे खोदकाम करताना आतल्या बाजूने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तरीकरण केले जाते. त्‍यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्‍येकी ११ मीटर इतका असणार आहे.

    दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्‍मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे ए‍कंदर ११ छेद बोगदे देखील या बोगद्यांचा भाग असणार आहेत. या बोगद्यांसाठी आपत्कालीन नियंत्रत्रण कक्ष असून त्यामध्ये स्वयंचलित यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. या बोगद्यांमध्‍ये सकार्डो ही वायूविजन प्रणाली लावली जाणार असून ती भारतामध्‍ये रस्‍ते बोगद्यांसाठी प्रथमच वापरली जाणार आहे. या बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे सयंत्रच्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठया व्‍यासाचे टीबीएम सयंत्र आहे. या सयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे सयंत्र देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. १२.१९ मीटर व्यास असणाऱ्या मावळा सयंत्राची उंची ४ मजली इमारती एवढी आहे. तर त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे. त्याचे वजन सुमारे २८०० टन इतके असून त्‍याबरोबर वापरण्‍यात येणाऱ्या स्लरी ट्रीटमेंट प्लांटच्‍या यंत्रसामुग्रीचे वजन सुमारे ६०० टन आहे. ‘मावळा’ सयंत्राची पाती दर मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत.

    कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्टये
    एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे. एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे. पॅकेज ४ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपूल ते प्रियदशिर्नी पार्क हे ४.०५ किलोमीटर अंतर, पॅकेज १ अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस हे ३.८२ किलोमीटर अंतर आणि पॅकेज २ मध्ये बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक असे २.७१ किलोमीटर अंतर याप्रमाणे कामाची विभागणी करण्यात आली आहे.