मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातात एकाच मृत्यू तर ३७ जखमी पैकी ८ गंभीर

पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समयसुचकतेमुळे जखमींना योग्य वेळेत रूग्णालयात दाखल करणे सोयीचे झाले

    माणगाव : गणेशोत्सवासाठी चाकरमानी भक्तांना कोकणात घेऊन जाणाऱ्या एस टी बसला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर बस मधील ३७ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ८ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्यावरती माणगाव, पनवेल व मुंबई येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात माणगाव तालुक्‍यातील रेपोली गावा जवळ पहाटे ४.३० च्या सुमारास घडला.

    रत्नागिरीतील राजापूर येथे गणेशोत्सवासाठी स्पेशल एस टी बस मुंबई येथून सोडण्यात आली होती. एकूण ३८ प्रवासी या बस मधून प्रवास करत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून रेपोली गावाजवळ आली पुढे असणाऱ्या ट्रेलर वरती आपटली ही धडक इतकी भयानक होती की बसची डाव्या बाजूचा भाग चक्काचूर झाला आहे. बस मधील सर्वच प्रवाशांना किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. एकाला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला तर ८ जणांना अधिक उपचाराची गरज असल्यामुळे पनवेल व मुंबई येथील रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

    अपघाताचे वृत्त समजताच महामार्गावर पेट्रोलिंग करणारे पोलीस, माणगाव डि वाय एस पी गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नावले व अन्य कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समयसुचकतेमुळे जखमींना योग्य वेळेत रूग्णालयात दाखल करणे सोयीचे झाले या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली असतानाही मोठ मोठे कंटेनर व अवजड वाहने बिनदिक्कत पणे महामार्गावर चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी अवघ्या एका दिवसांत रायगड पोलीसांनी १०७ तर आर टी ओ विभागाने २७ जणांवर कारवाई केली आहे. रेपोली येथे बसच्या झालेल्या अपघाताच्या वेळी देखील कंटेनर जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहतूक बंदी असतानाही हा कंटेनर मुंबई कडून गोवा कडे चालला असताना बस त्यावरती पाठीमागून आदळली.