
गेले काही दिवस हसन मुश्रीफ हे ईडीच्या रडारवर आहेत. दोन साखर कारखान्यांत मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यात सुमारे १५८ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीची कारवाई होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणात (Money Laundering) त्यांच्या पुणे आणि कोल्हापूरच्या घरावर तीन वेळा छापेमारी झालेली आहे. शनिवारी त्यांची सुमारे ९ तास त्यांच्या राहत्या घरी चौकशी करण्यात आली होती. सोमवारी त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र मुश्रीफ उपस्थित राहिले नव्हते. या प्रकरणात अटकेची शक्यता असल्यानं मुश्रीफ यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी पुढील दोन आठवडे मुश्रीफांना (Relief To Hasan Mushrif) अटक करु नये, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. तसंच मुश्रीफ यांना अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.
काय घडलं कोर्टात?
१. दोन आठवडे कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे न्यायालयाचे ईडीला आदेश.
२. आम्ही हा खटला गुणवत्तेच्या आधारावर ऐकणार नाही – उच्च न्यायालयाये मत
३. हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश आणि विशेष सत्र न्यायालयाने लवकरात लवकर प्रकरणावर सुनावणी घ्यावी, हायकोर्टाचे निर्देश
४. अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची उच्च न्यायालयात धाव.
ईडीचे अधिकारी कोल्हापुरातच
गेले काही दिवस हसन मुश्रीफ हे ईडीच्या रडारवर आहेत. दोन साखर कारखान्यांत मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यात सुमारे १५८ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. शनिवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांची चौकशी केली, त्यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सुमारे ९ तास ही चौकशी सुरु होती. मात्र त्यानंतरही ईडीचे अधिकारी मुंबईत परतलेले नाहीत, ते सध्या कोल्हापुरातच ठाण मांडून बसलेले आहेत. यामुळं मुश्रीफ यांच्याविरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.