anil deshmukh and sanjeev palande

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर त्यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांनादेखील मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे.

  मुंबई: भ्रष्टाचार प्रकरणात (Corruption Case) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर त्यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांनादेखील मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे. संजीव पालांडेंनी (Bail To Sanjeev Palande) नोव्हेंबर 2022 मध्ये सीबीआय प्रकरणामध्ये जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

  संजीव पालांडे यांना जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. पालांडे यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पालांडे यांना पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे निर्देश  न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील कुठल्याही साक्षीदाराला भेटणे तथा त्यांच्याशी संवाद साधू नये असे न्यायालयाने अटी व शर्तीमध्ये म्हटले आहे.

  20 डिसेंबरला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन
  मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद एस कार्णिक यांच्या पीठाकडून बुधवारी सेंट्रल बोर्ड ऑफ इन्व्हेस्टीगेशन (सीबीआई) च्या भ्रष्टाचार प्रकरणात संजीव पालांडेंना जामीन मिळाला आहे. याआधी गेल्या वर्षी 20 डिसेंबरला न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या पीठाने प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पालांडेंना जामीन मिळाला होता.

  सीबीआय प्रकरणात जेल
  दरम्यान न्यायमूर्ती जमादार यांनी सांगितलं होतं की, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी पालांडेंना अडकवण्यात आल्याच्या मुद्द्यावर प्रतिपक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे त्यांनी जेलमध्येच राहावं. कारण अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मिळत नाही.

  सीबीआय वाझेंच्या सांगण्यावर अवलंबून
  याआधीच्या सुनावणीत वकील शेखर जगताप यांनी पालांडेवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप नाकारले होते. ते म्हणाले होते की त्यांच्या अशीलाला ईडीच्या प्रकरणात जामीन देण्यात आला होता. केंद्रीय तपास यंत्रणांचा तपास पूर्णपणे झालेला नाही. कारण ते फक्त वाझेंच्या स्टेटमेंटवर आवलंबून आहेत. ते पालांडेंना फसवू शकत नाही.

  अँटिलिया स्फोटक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. बदली करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता. यामध्ये मध्यस्थाची भूमिका पलांडे यांची असल्याचे सांगण्यात येत होते.