मोदी आल्यापासून मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व कमी झाले; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

डबल इंजिन सरकार आल्यापासून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. पालघर प्रकल्प गुजरातला गेला, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र करण्याचे स्वप्न होते ते अचानक अहमदाबादला गेले. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, पण काहीच प्रयत्न केले गेले नाही. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन करा, असे कोण म्हणाले होते का? तरी इतका महाग प्रकल्प राज्यावर का लादला?, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

    मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta- Foxconn Project) राज्याच्या हातातून निसटल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर खापर फोडत आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर टीका केली आहे. मोदी आल्यापासून मुंबई (Mumbai), महाराष्ट्राचे महत्त्व कमी झाले आहेत; तसेच, गुजरातचे (Gujarat) महत्त्व वाढवायचे प्रयत्न सुरू आहेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

    डबल इंजिन सरकार आल्यापासून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. पालघर प्रकल्प गुजरातला गेला, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र करण्याचे स्वप्न होते ते अचानक अहमदाबादला गेले. तेव्हा फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, पण काहीच प्रयत्न केले गेले नाही. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन करा, असे कोण म्हणाले होते का? तरी इतका महाग प्रकल्प राज्यावर का लादला?, असे चव्हाण म्हणाले.

    चव्हाण पुढे म्हणाले, हा यांचा पॅटर्नच आहे. मोदी आल्यापासून त्यांना मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून गुजरातचे महत्त्व वाढवायचे आहे. मोदींसमोर तोंड उघडण्याची फडणवीसांची छाती नाही. डबल इंजिन सरकारची किंमत महाराष्ट्राला चुकवत आहे. मला दुर्दैवाने सांगावे वाटते की कोणतेही पंतप्रधान इतके पक्षपातीपणे वागले नाहीत. गुजरात पाकिस्तान नाहीच, पण राज्यात स्पर्धा असते. आज महाराष्ट्र पुढे गेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण केले नाही, असेही चव्हाण म्हणाले.