मुंबई पालिकेकडून २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक २६ सप्टेंबर २०२२ ते दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधी दरम्यान ‘सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम’ (Active Case Finding / ACS) आणि कुष्ठरोग शोध अभियान (Leprosy Case Detection Campaign / LCDC) राबविण्यात येणार आहे.

    मुंबई : भारत सरकारने दिलेल्या उद्दिष्टांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सन २०२५ पर्यंत क्षयरोग दूरीकरणाचे ध्येय, तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार व उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) उप आयुक्त संजय कु-हाडे यांच्या सुचनांनुसार महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे.

    दरम्यान, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक २६ सप्टेंबर २०२२ ते दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधी दरम्यान ‘सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम’ (Active Case Finding / ACS) आणि कुष्ठरोग शोध अभियान (Leprosy Case Detection Campaign / LCDC) राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची चमू घरोघर जाऊन क्षयरोग व कुष्ठरोग याबाबत आरोग्य तपासणी करण्यासह जनजागृती देखील करणार आहे. तरी नागरिकांनी घरी येणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चमुला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.