गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचरा फेकणं पडलं महागात, मुंबई पोलिसांकडून एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल!

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक टॅक्सीमधून कचऱ्याच्या बॅग आणून समुद्रात फेकताना दिसत आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे या परिसरात एकही पोलिस घटनास्थळी उपस्थित नव्हता.

    मुंबईतील वर्दळीचा परिसर म्हणून ओळख असलेल्या गेट वे ऑफ इंडियासमोर (Gate Way Of India) एका व्यक्तीने समुद्रात कचरा फेकल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर (Mumbai police registered FIR) दाखल केला आहे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती दिवसाढवळ्या कचऱ्याच्या पिशव्या समुद्रात फेकताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली.

    समुद्रात फेकला कचरा

    दोन दिवसापुर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये काही व्यक्ती टॅक्सीतून उतरून गेट वे ऑफ इंडियाजवळील फुलांचा कचरा समुद्रात फेकत होते. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक टॅक्सीमधून कचऱ्याच्या बॅग आणून समुद्रात फेकताना दिसत आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे या परिसरात एकही पोलिस घटनास्थळी उपस्थित नव्हता.

    आनंद महिंद्रा यांचा निषेध करून कारवाईची केली मागणी

    इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी सोशल मीडियावर त्या व्यक्तीवर टीका केली होती. X (पूर्वीचे ट्विटर) वर मुंबई पोलीस आणि बीएमसीला टॅग करत आनंद महिंद्रा यांनी  लिहिले, ‘हे पाहून दुःख झाले. पायाभूत सुविधा कितीही चांगल्या असल्या तरी. पण जोपर्यंत आपण आपल्या सवयी सुधारत नाही तोपर्यंत सकारात्मक बदल होणार नाही.