मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत! सिग्नल बिघडल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर मोठा परिणाम

ठाणे स्थानकाजवळ आलेल्या प्रवाशांनी अखेर रेल्वे रुळावर उतरून स्थानक गाठणे पसंत केले, मात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक अडकून पडले.

    मुंबई रेल्वे सेवा : सकाळी 9.16 वाजता ठाण्यातील सर्व रेल्वे मार्गावरील उपनगरीय सेवा काही तांत्रिक कारणांमुळे ठप्प झाली. सोमवारी 13 मे रोजी सकाळी ठाण्यात सिग्नल बिघडल्याने येथील मध्य रेल्वेच्या मुख्य कॉरिडॉरवरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. ठाणे येथे सर्व मार्गांवर सिग्नल बिघाड झाल्यामुळे, कल्याण (ठाणे) आणि कुर्ला (मुंबई) दरम्यानच्या सेवा प्रभावित झाल्या आहेत. उन्हाळ्यात लोकल गाड्या खचाखच भरून गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. ठाणे, दिवा, मुंब्रा स्थानकांवर गर्दी होती. ठाणे स्थानकाजवळ आलेल्या प्रवाशांनी अखेर रेल्वे रुळावर उतरून स्थानक गाठणे पसंत केले, मात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक अडकून पडले.

    ठाणे स्थानकापासून सर्व लोकल एका मागोमाग उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एक तासाहून अधिक वेळ रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. लोकल ट्रेनमधील सर्व प्रवासी त्रस्त होऊन रेल्वे ट्रकवरून चालत निघाले आहेत. या मार्गावरील विविध स्थानकांवर सकाळी गर्दीच्या वेळी गाड्यांची वाट पाहणाऱ्या कार्यालयात जाणाऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हजारो कर्मचाऱ्यांना लेट मार्कचा सामना करावा लागला. दिवा-मुलुंड मार्गावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या, स्थानकावर अनेक ठिकाणी प्रवासी ताटकळत होते.

    सकाळी 10.15 वाजता सिग्नलिंग यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आणि सर्व मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सीआरच्या प्रवक्त्याने सांगितले.
    लोकल सेवा