‘मुंबईत रोड शो शहाणपणाचे लक्षण नाही’; पंतप्रधानांच्या दौऱ्यावर शरद पवारांची टीका

  नाशिक : लोकसभा निवडणूकीचा पाचवा मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. येत्या 20 मे रोजी कल्याण, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी आणि मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसले आहेत. त्यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

  नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर जहरी टीका केली. मोदींचा काल घाटकोपरमध्ये रोड शो पार पडला. त्यांच्या रोड शो मुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. चाकरमान्यांना यामुळे नाहक त्रास भोगावा लागला. यावर शरद पवार म्हणाले, “मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो करणे शहाणपणाचे लक्षण नाही. हे बरोबर नाही. तसेच त्यांनी फक्त गुजराती भागांमध्येच दौरा केला. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे यांचं नेमकं चाललयं तरी काय” असा सवाल उपस्थित करत शरद पवार यांनी टीकास्त्र डागलं आहे.

  मोदींना कसला त्रास झाला ते मला समजलं नाही

  तसेच नरेंद्र मोदी यांनी सभेमध्ये शरद पवार यांच्या कॉंग्रेसमधील विलीनकरणाच्या वक्तव्यावर भाष्य केले. यावरुन राज्याचे राजकारण रंगलेले असताना शरद पवार यांनी पुन्हा एकदा त्या मुद्दायावर स्पष्टीकरण दिले आहे. पवार म्हणाले,’मीच असं सुचवलेलं की, काँग्रेसची विचारधारा जोपासणारे, त्या विचारधारेवर चालणारे अनेक पक्ष आहेत… मी केवळ विचारधारेबद्दल बोलतोय. काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक पक्ष विखुरले आहेत. त्या पक्षांबाबत मी एक सल्ला दिला होता. सारख्या विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करणं खूप उपयुक्त ठरेल. हा माझा विचार होता. मात्र यामुळे मोदींना कसला त्रास झाला ते मला समजलं नाही.” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

  अजित पवारांची प्रचाराला अनुपस्थिती

  अजित पवार हे आता महायुतीच्या प्रचारामध्ये दिसत नाही. बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार यांनी इतर सभांना उपस्थिती लावली नाही. मुंबईतील रोड शोला देखील अजित पवार नव्हते. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली असताना शरद पवार यांनी त्यामागचे कारण सांगितले. शरद पवार म्हणाले, “बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नसवाते.” असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.