माहीमचे शीतलादेवीच्या शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास, कोळी बांधवांचे कुलदैवत

गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट ही संस्था बऱ्याच वर्षापासून या मंदिराचा कारभार सांभाळत आहे. संस्थेतर्फे बरीच समाजोपयोगी कामे केली जातात.

    मुंबई : कोळी बांधवांचे कुलदैवत असलेल्या शीतलादेवीचे माहीम येथील मंदिर हे अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचे आहे. ही देवी पूर्वी मुंबईच्या किनाऱ्यालगत होती. मात्र, कालांतराने कोळी बांधवांनी शीतलादेवीची मूर्ती किनाऱ्यावरून हलवून ती माहीम पश्चिमेला स्थापन केलेली आहे. शीतलादेवी कोळी बांधवांसाठी संकटसमयी धावणारी आहे.

    मंदिराच्या आवारात मारुती, खोकलादेवी, कालिकामाता, भगवान शंकर, गणपती, स्वामी समर्थ, शांतादुर्गा आणि विठोबा या देव-देवतांची मंदिरे असल्यामुळे येथील वातावरण प्रसन्न असते. येथे नवरात्री उत्सवात मंगळवारी व शुक्रवारी देवीला सोन्याचा मुकुट चढवला जातो. मंदिरानजीक पुरातन विहीर आहे. फार दूरवरून लोक याठिकाणी स्नानासाठी येतात. त्या विहिरीतील पाण्याने आंघोळ केली असता त्वचेसंबंधी उद्भवणारे रोग नाहीसे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

    सिंधी समाजाचे लोक त्यांच्या परंपरेनुसार वर्षातून एकदाच जायवळ (लहांचे मुलांचे केस कापणे) करतात. यावेळी ते खास दसरा सणाचा मुहूर्त आणि माहीमच्या शीतला देवीच्या मंदिराच्या आवाराची त्यासाठी निवड करतात हे विशेष मंदिराच्या आवारात खोकलादेवीच्या कृपाप्रसादामुळे खोकल्याचे रुग्ण बरे होतात. अनेक धार्मिक सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने येथे पार पाडले जातात. नवरात्रीच्या अष्टमीला मोठा हवन मंदिरात केला जातो. शिवाय माघ महिन्यातील नवरात्रोत्सवात देखील देवीला सोन्याचा मुकुट चढवला जातो. तसेच यज्ञ, अभिषेक केले जातात. मंदिरात दररोज सकाळी ९:०० वाजता आणि रात्री ७.३० वाजता आरती केली जाते.

    लवकरच सुरु होणाऱ्या भूमिगत मेट्रोच्या स्थानकाचे नाव सुद्धा शीतला देवी मंदिर स्थानक असे ठेवण्यात आले आहे. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट ही संस्था बऱ्याच वर्षापासून या मंदिराचा कारभार सांभाळत आहे. संस्थेतर्फे बरीच समाजोपयोगी कामे केली जातात. विभागातील किंवा अन्य विभागातील गरजू मुलांना शिक्षणाचे साहित्य पुरवले जाते. गरीब कुटुंबांना संस्थेतर्फे वैद्यकीय उपचारांसाठी सहकार्य केले जाते. कॅन्सरग्रस्तांसाठी शिवाय अनाथाश्रमातील महिलांसाठी मोफत साडय़ा दिल्या जातात. नवरात्रोत्सवा दरम्यान भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते.