मुंबईकरांनो, काळजी घ्या! मुंबईत हवेतील गुणवत्ता खालावली; प्रदूषणात वाढ डॉक्टरांनी दिला इशारा, म्हणाले…

गुरुवारी दिवसभर उन्हाचा ताप जाणवूनही हवेमध्ये प्रदूषके हवेमध्ये साचून राहिल्याचे आढळून आले. या काळामध्ये अतिरिक्त थकवा जाणवण्याची शक्यताही वाढू शकते. फुप्फुसांचे आजार असणाऱ्यांना किंवा हृदयरोग असणाऱ्यांना हा त्रास अधिक जाणवू शकतो, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    मुंबई : सध्या हिवाळा सुरु आहे, त्यामुळं राज्यातील काही भाग सोडता सर्वंत्र थंडी, गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत, दरम्यान, जरी राज्यात थंडी असली तरी देखील अजून मुंबईत म्हणावी तशी थंडी पडलली नाहीय. दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळं मुंबईतील वातावरण बिघडले असून, मुंबईत हवेतील गुणवत्ता खालावली आहे, त्यामुळं त्याच्या परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. मुंबईत किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील गुरुवारीची हवेतील गुणवत्ता कमालीची खालावली होती.

    दरम्यान, गुरुवारी मुंबईत माझगाव, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी येथील हवेची गुणवत्ता दिवसभर ‘अतिवाईट’ नोंदवली गेली. ‘सफर’ या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस हवा वाईट ते अती वाईट या श्रेणीत असेल. २५ डिसेंबरच्या आसपास मुंबईच्या तापमानाचा पारा आणखी उतरण्याची शक्यता आहे. सांताक्रूझ येथे गुरुवारी कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३०.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान २५ डिसेंबरच्या आसपास २८ अंशांपर्यंत खाली उतरू शकते.

    पुढील काळात मुंबईमध्ये थंडीची तीव्रता काही काळ वाढणार असल्याने त्याचा परिणाम प्रदूषणावरही होण्याची शक्यता आहे. या काळात किमान तापमानाचा पारा १३ ते १४ अंशांपर्यंत खाली येऊ शकतो. कमाल तापमानातही घट होऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा धुरक्याची जाणीवही मुंबईकरांना होऊ शकते. गुरुवारी दिवसभर उन्हाचा ताप जाणवूनही हवेमध्ये प्रदूषके हवेमध्ये साचून राहिल्याचे आढळून आले. या काळामध्ये अतिरिक्त थकवा जाणवण्याची शक्यताही वाढू शकते. फुप्फुसांचे आजार असणाऱ्यांना किंवा हृदयरोग असणाऱ्यांना हा त्रास अधिक जाणवू शकतो, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे, त्यामुळं काळजी घेण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे. तसेच यामुळं मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.