मुंबईकरांनो काळजी घ्या! गोवरने आज १ जण दगावला; आतापर्यंत ११ मृत्यूंची नोंद

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८ तर मुंबई महानगर प्रदेशात एकूण ११ गोवर मृत्यू झाले आहेत. गोवर रुग्ण मात्र घटत असून लसीकरणावर भर दिला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच अहवालानुसार मंगळवारी १२ नवे गोवर निश्चित रुग्णांची नोंद करण्यात आली.

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या (BMC Health Department) मृत्यू तपासणीच्या मंगळवारच्या अहवालानुसार (Accoding To Tuesday Death Reports) नालासोपारा (Nalasopara) येथील १ वर्षाच्या मुलाचा गोवरने (Measles) मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

    दरम्यान मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८ तर मुंबई महानगर प्रदेशात एकूण ११ गोवर मृत्यू झाले आहेत. गोवर रुग्ण मात्र घटत असून लसीकरणावर भर दिला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच अहवालानुसार मंगळवारी १२ नवे गोवर निश्चित रुग्णांची नोंद करण्यात आली. यात बी वॉर्ड २, जी नॉर्थ १, जी साऊथ १, के वेस्ट १, एल वॉर्ड ३, एम पूर्व २, पी नॉर्थ १ तर पी एस १ असे १२ रुग्णांची नोंद करण्यात आली.

    आज निश्चित झालेल्या गोवर मृत्यूत हा १ वर्षाचा मुलगा नालासोपारा पूर्वेला राहत असून त्याला सर्दी, खोकल्याचा एका महिन्यापासून त्रास होता. त्याला गोवरचे लसीकरण झाले नव्हते. १३ नाव्हेंबर रोजी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर १४ नोव्हेंबर रोजी त्याला सरकारी रुग्णालयात न्युमोनियाचा रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र १८ नोव्हेंबर रोजी त्याची ऑक्सिजन पातळी घसरली. तर २१ नोव्हेंबर रोजी त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. २२ नोव्हेंबर मंगळवारी त्याची प्रकृती चिंताजनक खालावली. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

    आजपर्यंत संशयित गोवर रुग्ण ३ हजार ३७८ एवढे असून त्यातून २२० निश्चित गोवर रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आता पर्यंत २ लाख ९७ हजार ७४ घरांची तपासणी करण्यात आली असून यातून १७० ताप आणि पुरळ असलेले रुग्ण आढळून आले. तर २३० लसीकरण सत्रातून ५८८ जणांना एमआर१ तसेच ६२० जणांना एमएमआर लस देण्यात आली. शिवाय १४३ अतिरिक्त सत्रातून ३७५ जणांना एमआर१ तर ४४८ जणांना एमएमआर लस देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.