मुंबईकरांनो, आज मेट्रोनं प्रवास करणार असाल थांबा… वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा; अन्यथा मध्येच अडकू शकता

मुंबई मेट्रोच्या मेट्रो २ अ (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो सेव्हन (Mumbai Metro 7) या मार्गाचं पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यावेळी पंतप्रधान मेट्रोतून प्रवासही करण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुरक्षिततेची खबरदारी म्हणून मेट्रो वनची सेवा १९ जानेवारीला संध्याकाळी पावणेदोन तास बंद ठेवण्यात येणार आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) असणार आहेत. या दिवशी म्हणजे आज गुरुवारी (१९ जानेवारी) मेट्रो वनची (Metro One) सेवा दोन तासांसाठी बंद राहणार आहे. आज संध्याकाळी ५.४५ ते ७.३० वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद (Metro Service Closed) राहणार आहे. संध्याकाळी कार्यालये सुटण्याचीच वेळ साधली असल्याने चाकरमान्यांना आजचा प्रवासाचं नियोजन करावं लागणार आहे.

    मुंबई मेट्रोच्या मेट्रो २ अ (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो सेव्हन (Mumbai Metro 7) या मार्गाचं पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यावेळी पंतप्रधान मेट्रोतून प्रवासही करण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुरक्षिततेची खबरदारी म्हणून मेट्रो वनची सेवा १९ जानेवारीला संध्याकाळी पावणेदोन तास बंद ठेवण्यात येणार आहे.

    अंधेरी पूर्व परिसरात अनेक कार्यालयं आहेत. संध्याकाळी ज्या वेळेत मेट्रो सेवा बंद असणार आहे, त्याच वेळेत अनेक कार्यालय सुटतात. त्यामुळे अनेक लोक घरी परतण्यासाठी किंवा लोकलच स्टेशन गाठण्यासाठी मेट्रोवर अवलंबून आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद ठेवण्यात येणार असल्यानं घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तुम्हीही याच ठिकाणाहून दररोज मेट्रोनं प्रवास करणार असाल, तर आजच्या प्रवासाचं नियोजन करणं तुमच्याच हिताचं असणार आहे.

    काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कारणास्तव मेट्रो बंद करण्यात येणार असल्याचं मुंबई मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगितलं आहे. त्यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही मेट्रोकडून करण्यात आलं आहे. पंतप्रधान अंधेरी पूर्वमधील गुंदवली मेट्रो स्थानकाचं उद्धाटन करणार आहेत. २०१५ मध्ये याच मार्गिकांच्या कामाची पायाभरही पंतप्रधानांच्याच हस्ते करण्यात आली होती. मोदींच्या स्वागताची आणि मेट्रो २ अ आणि मेट्रो सेव्हन या मार्गांच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मेट्रो स्टेशन परिसरातील भिंती सजवल्या आहेत. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उपयायोजना करण्यात आल्या आहेत. याच कारणास्तव मेट्रो वनची सेवाही संध्याकाळी पावणेदोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.