मान्सूनपूर्व सरींमुळे मुंबईकरांना दिलासा, 24 तासांत कोकणात दाखल होणार

पुढील २४ तासांत महाराष्ट्रासह देशातील काही प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

    मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. काही तासांतच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

    पुढील २४ तासांत महाराष्ट्रासह देशातील काही प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामध्ये मध्य अरबी समुद्रासह, गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि दक्षिण आंध्र प्रदेशातील काही भागांत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

    काल मुंबईसह सातारा जिल्ह्यातील काही भागात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यात महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात धुक्याची चादर पसरलेली पसरली असून अनेक ठिकाणी घाटरस्ते या धुक्यात हरवले होते. या धुक्यातून वाट काढत पर्यटक मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत.