मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टाेपली ;सिडकाेत सर्रास रस्त्याचे खाेदकाम

सिडको परिसरात गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आल्याने परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. रस्त्यावर खळी आल्याने अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचे झालेले आहेत.

  सिडको : शहरासह सिडको परिसरात गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आल्याने परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. रस्त्यावर खळी आल्याने अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचे झालेले आहेत. नुकतेच महापालिकेने १० मेनंतर रस्ते खोदणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेश दिले होते; मात्र ते आदेशाची संबंधित ठेकेदाराकडून पायमल्ली हाेत आहे. या ठेकेदारांना मनपाचे बांधकाम विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांचा खोदकामाला छुपा पाठिंबा आहे का? अशी शंका नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

  १० मेनंतर रस्ता खोदल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिला आहे. असे असतांनादेखील सिडकोतील एकदंत नगर भागात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी ब्रेकरच्या सहाय्याने रस्ते खोदण्यात येत आहे. मुदत संपूनही रस्ते खोदणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

  काम सुरू असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेतो. रस्ते खोदल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

  - हेमंत पठ्ठे, उपअभियंता, सा.बां. विभाग

  महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार वंजारी यांनी १० मेनंतर रस्ता खोदल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता; मात्र मुदत संपूनही याकडे दुर्लक्ष करून मुजोरी करून रस्ते खोदण्यात येत आहे. यात संबंधित महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारांची मिलीजुली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे मनाई असतानाही रस्ते खोदणाऱ्या संबंधित ठेकेदारा वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच खोदण्यात आलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करून डांबरीकरण करण्यात यावे.

  - प्रशांत जाधव, युवक महानगरप्रमुख आरपीआय (आठवले गट)