ठेकेदाराला २० हजार रुपयांची लाच मागणारा मनपा शिपाई जाळ्यात, एसीबीची कारवाई

पुणे शहरातील मृत जनावरे उचलण्याचा ठेका संपल्याने त्यासंबंधीत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेतील शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.

    पुणे : पुणे शहरातील मृत जनावरे उचलण्याचा ठेका संपल्याने त्यासंबंधीत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेतील शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.

    इर्शाद असे गुन्हा दाखल केलेल्या शिपायाचे नाव आहे. तो महापालिकेच्या आरोग्य भवन येथे कामाला आहे. यातील तक्रारदार यांनी महापालिका हद्दीतील मृत जनावरे उचलण्याचा ठेका मिळाला होता. या कराराची मुदत संपली. त्यानंतर महापालिकेकडे ठेव असलेली साडेपाच लाखांची रक्कम परत मिळण्यासाठी तक्रारदारांनी प्रयत्न सुरू केले होते.

    निम्मी रक्कम तक्रारदारांना परत मिळाली होती. उर्वरित रक्कम परत मिळण्याचा ते प्रयत्न करत असताना इर्शादने त्यांना वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील, असे सांगत रक्कम मिळवून देईल असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली होती.

    तक्रारीची पडताळणी केली. त्यात इर्शाद याने वरिष्ठांसाठी तडजोडीत २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले. दरम्यान, तक्रारदार यांना उर्वरित रक्कम परत मिळाली. त्यामुळे तक्रारदार यांनी माघार घेतली होती. मात्र, लाचेची मागणी झाल्याने लाच मागणीचा गुन्हा दाखल केला.