अनधिकृत गाेदामांवर हाताेडा; बिबवेवाडीत महापालिकेची 29 बांधकामांवर कारवाई

राजकीय वरदहस्तामुळे बिबवेवाडीत उभ्या राहिलेल्या अनधिकृत गाेदामांवर महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने हाताेडा चालविला. २९ अनधिकृत गाेदामे यावेळी पाडण्यात आली. गेल्या काही दिवसांतील ही बांधकाम नियंत्रण विभागाची माेठी कारवाई मानली जात आहे.

  पुणे : राजकीय वरदहस्तामुळे बिबवेवाडीत उभ्या राहिलेल्या अनधिकृत गाेदामांवर महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने हाताेडा चालविला. २९ अनधिकृत गाेदामे यावेळी पाडण्यात आली. गेल्या काही दिवसांतील ही बांधकाम नियंत्रण विभागाची माेठी कारवाई मानली जात आहे.

  गंगाधाम चाैक ते शत्रुजंय मंदिर (कोंढवा) रस्त्याच्या दुतर्फा मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गोदामे आणि शोरूम्स झाली आहेत. हा परिसर हिलटॉप, हिलस्लोप असून येथे बांधकामाला परवानगी नाही. यानंतरही सुमारे १०० हून अधिक छोटी, मोठी गोदामे आणि दुकाने उघडण्यात आली आहेत. या गोदामांवर महापालिका सातत्याने कारवाई करत आहे. तसेच मिळकत कर विभागाने त्यांना तीनपट कर आकारणी केली आहे.

  मात्र, यानंतरही बेकायदा कामांना कुठलाही चाप बसलेला नाही. मध्यंतरी येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी प्रचंड नुकसान झाले आहे. आगीच्या घटनांच्या वेळी अग्निशामक दलाच्या गाड्या देखिल घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत अशी स्थिती आहे.

  गेल्यावर्षी देखील महापालिकेने कारवाई करून काही गाेदामे पाडली हाेती. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई थांबली हाेती. या बांधकामांवर महापालिकेने पुन्हा एकदा हाताेडा चालविला आहे. एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, महापालिका मनुष्यबळगट एक, दोन पोलीस गट यांचा समावेश असलेल्या पथकाकडून २९ अनधिकृत गाेेदामे पाडण्यात आली. आई माता मंदिर ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजू कडील बिबवेवाडी पोलीस चौकीच्या हद्दीतील भागात ही कारवाई करण्यात आली.

  शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक, वंदना गवारी कनिष्ठ अभियंता, पियुष दिघे, प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाने आदी यावेळी उपस्थित हाेते.

  वारंवार नोटिसा देऊनही दुर्लक्ष

  महापालिकेची परवानगी न घेता बिबवेवाडीतील घाटमाथ्यावर अनेक व्यावसायिकांनी गोडाऊन, दुकाने, शोरूम आदींची अनधिकृत बांधकामे केली आहेत. संबंधित बांधकाम धारकांना प्रशासनाने वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाने परिसरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बिबवेवाडी येथील डोंगरमाथा परिसरात अनेक पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच पत्राशेड, गोडाऊन उभारलेले आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.