नाशिकमध्येही मराठी पाट्या लावण्याबाबत महापालिका आक्रमक; ‘मराठी पाट्या लावा अन्यथा दोन हजार दंड भरा’

मराठी पाट्यांचा (Marathi Plates) मुद्दा तापला असून, राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शुक्रवारी (दि.१) करसंकलन विभागाची बैठक घेत शहर हद्दीत दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये यांच्या नावाच्या मराठीत पाट्या हव्या, अशा सूचना देत नियम पायदळी तुडवले जात असल्यास दोन हजार रुपये दंड आकारा, असे आदेश दिले आहेत.

    नाशिक : मराठी पाट्यांचा (Marathi Plates) मुद्दा तापला असून, राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शुक्रवारी (दि.१) करसंकलन विभागाची बैठक घेत शहर हद्दीत दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये यांच्या नावाच्या मराठीत पाट्या हव्या, अशा सूचना देत नियम पायदळी तुडवले जात असल्यास दोन हजार रुपये दंड आकारा, असे आदेश दिले आहेत.

    आयुक्तांनी हे आदेश दिले असले तरी पण दंड मनपाने आकारायचा की शॉप अॅक्ट लायसन्सने याबाबत संभ्रम आहे. याबाबत मनपाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. शासनाच्या निर्णयाकडे आता मनपाचे लक्ष आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार, दुकानांवरील पाट्या मराठीतच हव्या. मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक राहील आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

    अधिनियमानुसार, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनाधारकांनी त्यांच्या दुकानांवरील आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे. ज्या आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत आढळून येणार नाहीत, त्यांच्या आस्थापनेवर न्यायालयाच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. परंतु, या नियमांची पायमल्ली होत आहे.